
गेल्या अनेक दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर गायरान जमीन असो की टीईटी घोटाळा असे अनेक आरोप झाले. या साऱ्या प्रकरणावर अखेर त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मौन सोडले.
मुंबई – आपल्याच पक्षातील नेत्यांनी माझ्याविरोधात कट रचला आहे, असा गौप्यस्फोट शनिवारी शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर गायरान जमीन असो की टीईटी घोटाळा असे अनेक आरोप झाले. या साऱ्या प्रकरणावर अखेर त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मौन सोडले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सर्वांचा डाटा जमा झाला आहे. मुख्यमंत्री याबद्दल सभागृहात बोलले असेही त्यांनी म्हटले आहे. तर चाराणाच्या कागदाचा फायदा घेतला असेल, तर मला फासावर लटकवा असे सांगतानाच आमच्या पक्षाच्या बैठकीमधील बातम्या बाहेर येत आहे. मागे आमची मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झाले हे बाहेर आले. जे झाले नाही ते बाहेर लोकांपर्यंत जात आहे. त्यामुळे आपल्यातील कुणीतरी आपल्यातील खासगी गोष्टी बाहेर पुरवत असल्याचे मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घातले असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील केली असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. मी कुणाचे नाव घेणार नाही, पण मुख्यमंत्र्यांनी यांची चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, जे मी केले नाही ते केले म्हणताय, मा्झ्यावर बेछूट आरोप करण्यात येत आहे असे सांगताना मलाही त्रास होते असे त्यांनी म्हटले आहे. तर गायरान जमिनीप्रकरणी बोलताना 19 परिवारांना भेटून खरी गोष्ट पुढे आणा, त्याच्या जमिनीची नोंद असल्यावर कोर्टानेही त्यांनाकडे राहू देण्याचे सांगितले असे सत्तारांनी म्हटले आहे. अतिक्रमण केलेल्या बांधवांना बेघर करणे, त्यांत 2 लाख 53 हजार बांधवांना बेघर कसे करणार. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काम केले आहे. विरोधी पक्षातील लोकांनी कारखानदारी आणि संस्थेसाठी कोट्यावधीचा जमीनी लुटल्या असा, आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.