अब्दुल सत्तारांची राजकीय टोलेबाजी, जिल्हा बँकेची सभा हास्यकल्लोळाने गाजली

छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा बँकेची सभा झाली. यावेळी सत्तार यांनी राजकीय टोलेबाजी केली.

    अब्दुल सत्तार : कधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तर कधी शिंदेच्या शिवसेनेत नेहमीच अब्दुल सत्तार हे वेगवेगळ्या पक्षात असतात. परंतु ते नेहमी सत्तेत असतात. एवढेच नव्हे तर त्यांना मंत्रिपद देखील मिळत असतं. नेहमीच राजकारणी असो किंवा जनतेला प्रश्न पडत असतो की अब्दुल सत्तार नेहमी सत्तेत असण्यामागील कारण काय? या प्रश्नाचं उत्तर स्वतः अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा बँकेची सभा झाली. यावेळी सत्तार यांनी राजकीय टोलेबाजी केली. त्यांच्या या राजकीय टोलेबाजीने जिल्हा बँकेची सभा हास्यकल्लोळाने गाजली. “’र’ काढून टाकले की, माझ्या नावातच ‘सत्ता’ येते. माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो, असे सत्तार म्हणाले आहेत.

    दानवेंची टोलेबाजी…
    दरम्यान, याच सभेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील टोलेबाजी केली. दानवे यांनी नवनियुक्त अध्यक्ष अर्जुन गाढे यांची फिरकी घेताना म्हणाले, तुम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बनू नका. नाही तर सत्तार म्हणतील तिथे मार शिक्का, मार कोंबडा असे करू नका, पुढे काही झाले तर मैं ने तो कुछ नही किया, वो तो अर्जुनने किया असे म्हणायला देखील सत्तार मागेपुढे पाहणार नाहीत, असे सांगितल्याने सभागृहात हशा पिकला.

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. थकीत कर्जवसुली, अनिष्ट तफावत, दुष्काळ जाहीर करा, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या मुद्द्यावर ही सभा गाजली. विशेष म्हणजे यावेळी सभेस बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. त्यामुळे या सभेत अनेक नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत एकेमकांना खोचक टोले देखील लगावले.