सिल्लोडमधील जमिन प्रकरण : अब्दुल सत्तार यांच्या अडचणी नववर्षांतही कायम, CBIकडे 1400 पानांची तक्रार दाखल केल्याचा दावा

सामाजित कार्यकर्ते महेश शंकरपल्ली म्हणाले की, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ​​​​​​

    मुंबई – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी नववर्षांतही कायम आहेत. गतवर्षी त्यांच्यावर टीईटी, गायरान जमीन प्रकरण व कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप झाला. त्यानंतर आता सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी त्यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप केला आहे. यामुळे सत्तार यांच्या अडचणींत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात 2 तक्रारी सीबीआयकडे दाखल करण्यात आल्या आहेत. महेश शंकरपेल्ली यांनी एक तक्रार स्वत: दिली असून पाच जणांनी एकत्रित देखील सीबीआयकडे तक्रार दिली आहे.

    सामाजित कार्यकर्ते महेश शंकरपल्ली म्हणाले की, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ​​​​​​ ​सत्तार यांच्याविरोधात जी तक्रार दाखल करण्यात आली यामध्ये तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार केली आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आल्याची माहिती शंकरपल्ली यांनी दिली आहे.

    पुढे बोलताना महेश शंकरपल्ली म्हणाले की, शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. अब्दुल सत्तारांच्या विरोधात आजपर्यंत झालेल्या तक्रारींचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. सत्तार यांनी जमीन कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.