‘नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती का नाम गाडी’, महायुतीच्याच नेत्याचे टीकास्त्र

खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना भाजपच्या नेत्यांनी घराचा आहेर दिला आहे.  नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राच्या याचिकेवर काल (28 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

    अमरावती – खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना भाजपच्या नेत्यांनी घराचा आहेर दिला आहे.  नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राच्या याचिकेवर काल (28 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला. पुढच्या दोन आठवड्यात या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येईल, असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

    अभिजीत अडसूळ रवी व नवनीत राणा यांच्यावर टीका करताना म्हणाले, “नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे चलती का नाम गाडी. यांना दोघांना काय काम धंदे राहिले नाहीत. अमरावती लोकसभेवर आजही शिवसेनेचा दावा आहे आणि त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रचाराला यावं लागेल. नवनीत राणा, रवी राणा यांना पैशांचा माज आला आहे. यांना वाटतं की पैसे घेऊन ते सुप्रीम कोर्टाला देखील विकत घेऊ शकतात. अशा अशाप्रकारे वागत आहेत. पण सुप्रीम कोर्टाचा अजून निर्णय यायचा आहे. दोन आठवड्याचा कालावधी अजूनही बाकी आहे. पण तरी देखील अशा पद्धतीची विधानं म्हणजे पोरखेळ आहे, अशा शब्दांत अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

    “नवनीत राणा यांची पूर्ण वंशावळ आम्ही काढली. सुप्रीम कोर्टात गेलो, मग तिथे त्यांनी कसं त्याचं वजन वापरलं ते देखील आम्ही पाहिलं. त्यामुळे त्यांनी बोलताना तारतम्य वापरावं, असा इशारा अभिजीत अडसूळ यांनी दिला. अमरावतीच्या जागेवर आमचाच दादा कायम आहे. ती जागा आनंदराव अडसूळच लढवतील, विषय संपला”, असे देखील अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत.