अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार झाले जागे; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडवर

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. यानंतर आता राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही उपाययोजना राज्य सरकार करणार आहे.

    मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या घालून हत्या (Abhishek Ghosalkar Murder Case)  झाल्यानंतर राज्य सरकारवर जहरी टीका करण्यात येत आहे. दहीसर येथे लाईव्ह करत असताना मॉरिस नोरोन्हा (Maurice Noronha) याने गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. उल्हासनगरमधील आमदारावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री फडणवीसांवर (DCM Devendra Fadnavis) जहरी टीका केली. यानंतर आता राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही उपाययोजना राज्य सरकार करणार आहे.

    दहिसर- बोरिवली परिसरात मॉरिस नोरोन्हा हा स्वयंसेवी संघटना चालवत होता. त्याच्यामध्ये अभिषेक घोसाळकर यांनी गुरुवारी (८ फेब्रुवारी) संध्याकाळी मॉरिसबरोबर फेसबूक लाइव्ह केलं होतं. या फेसबूक लाईव्हदरम्यान, मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अभिषेक घोसाळकर फेसबूक लाइव्हद्वारे लोकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे.” हा संवाद संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून उभे राहिले. त्याचवेळी मॉरिसने त्यांच्यावर सलग पाच गोळ्या झाडल्या. या प्रसंगानंतर राजकारणामध्ये वादंग निर्माण झाला. राज्यामध्ये काय चालू आहे आणि कायदा व सुव्यवस्था यांना तिलांजली वाहिली जात असल्याची टीका केली जात आहे. यावरुन आता राज्य सरकार जागे झाले असून यापुढे हत्यारे बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

    हत्येच्या या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर शस्त्र परवानाधारक हत्यांरांचा गैर वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांना काही आदेश दिले आहेत. यापुढे पोलीस शस्त्र परवानाधारकांना बोलावून त्यांची चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्याहर हल्ला करण्यासाठी वापरलेलं पिस्तुल अवैधरित्या खरेदी केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मॉरिसला कोणताही शस्त्र परवाना दिला नव्हता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.