All four pillars of democracy in danger; Congress national spokesperson Abhishek Manu Singhvi

  पुणे : लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासारख्या स्वायत्तता यंत्रणा धोक्यात आल्या आहेत. चौकशी यंत्रणेला हाताशी धरून होणाऱ्या राजकारणातून संपूर्ण लोकशाहीला वेठीस धरले जात आहे. श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि उपाध्यक्ष सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.

  लोकशाहीचे आधारस्तंभ त्यांचे घटनात्मक कार्य

  महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ वकील आणि सिव्हील सोसायटी सदस्यांशी संवादात्मक संवाद कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. ‘लोकशाहीचे आधारस्तंभ त्यांचे घटनात्मक कार्य’ या विषयावर अभिषेक सिंघवी बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या वतीने करण्यात आले होते. माजी न्यायाधीश बी. जी कोळसे पाटील, जेष्ठ नेते उल्हास पवार, माजी खासदार ऍड वंदना चव्हाण, प्रसिद्ध विधीज्ञ असीम सरोदे, कॉम्रेड अजित अभ्यंकर कामगार नेते सुनील शिंदे आप चे सुदर्शन जगदाळे एडवोकेट रवी जाधव माजी नगरसेविका संगीता तिवारी यावेळी उपस्थित होते.

  लोकशाही वाचवण्यासाठी सकारात्मक विचार

  अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी सकारात्मक विचार व विश्वास ठेवला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून लोकशाही बळकट व जिवंत ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे. केवळ नाराजीतून आणि नकारात्मक विचारातून या घडामोडींकडे पाहत राहिलो तर सामाजिक परिवर्तन होणार नाही. तसेच, लोकशाही टिकू शकणार नाही, यास आपणदेखील जबाबदार आहोत. त्यामुळे लोकशाही टिकवणे हे आपले कर्तव्ये आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

  संविधानाचा गैरवापर करू शकतात

  लोकशाहीला कोणीही हानी पोहचवू शकत नाही. काही काळासाठी वाईट प्रवृत्तीचे लोकं संविधान हातात घेऊन संविधानाचा गैरवापर करू शकतात. परंतु, कायमस्वरूपी संविधानाला नुकसान पोहचवू शकत नाही. तरीदेखील मागील 10 वर्षांच्या काळात संविधानाचे नुकसान करण्यात आले आहे. 10 वर्षांत केलेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी एकत्र यावे लागणार आहे. आपल्या सर्वांच्या ताकदीनेच राज्यघटना बदलण्याचा घाट हाणून पाडू शकतो.

  लोकशाही मूल्ये व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी काम

  नागरिकांनी लोकशाही, लोकशाही मूल्ये व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासारख्या स्वायत्तता यंत्रणा धोक्यात आल्या आहेत. चौकशी यंत्रणेला हाताशी धरून होणाऱ्या राजकारणातून संपूर्ण लोकशाहीला वेठीस धरले जात आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली
  गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली आहे. त्यांना लोकशाही मार्गाने जायचे नाही. एकाचवेळी संसदेत 142 खासदार निलंबित करणे हा मार्ग म्हणजे लोकशाहीला धोका पोचवण्याचा मार्ग आहे. लोकशाहीची सर्व मूलतत्वे त्यांना हाणून पडायची आहेत. त्या मार्गाने ते जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

  संसदेत मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांना संपवण्यासाठी ते काम करतात. त्यांच्या विरोधात बोलण्यास त्यांना भीती वाटते. त्यामुळे सर्व माध्यमांवर कब्जा केला आहे. अँकर, रिपोर्टर आपल्याच बाजूने बोलले पाहिजे, तसेच आपल्या विरोधात कोणीही बोलणारे एक्स्पर्ट स्टुडियोमध्ये गोदी मीडियाला नको आहे, असा आरोप यावेळी सिंघवी यांनी केला.

  भाजपाने 400 पारचा नारा दिला आहे, हे कोणते भय त्यांना आहे. ही लोकशाहीसाठी चिंताजनक परिस्थिती आहे. जगभरात भारत लोकशाहीने मजबूतीने उभा आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी विचार करावा, असे आवाहन सिंघवी यांनी केले. ईव्हीएमद्वारे भाजपा निवडणूक जिंकेल, अशी परिस्थिती आहे का, असा प्रश्न एका कार्यकर्त्यांनी मनुसिंघवी यांना विचारला यावर ते म्हणाले,

  ईव्हीएम मध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. दाल में कुछ काला है. परंतु ते प्रमाणित करता आले नाही, हे सगळे संशयास्पद आहे. हे आपल्याला अजून सिद्ध करता येत नाही. जेव्हा सिद्ध होईल तेव्हा तो डाव हाणून पाडू. याप्रसंगी ऍड असीम सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभय छाजेड यांनी प्रास्तविक केले. उल्हास पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास वकील व सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी मोठी गर्दी केली होती.