मानवी हक्क आयोग बरखास्त करा; असीम सरोदे यांची मागणी

मानवी हक्क आयोग हे बिनदातांचे वाघ आहेत. त्यांच्यावर दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च होतात. परंतु त्यांचा मानवी हक्क संरक्षणाचा उद्देश एक टक्काही सफल होत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सर्व मानवी हक्क आयोग बरखास्त करावेत. असे ठाम मत मानवाधिकार वकिल अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

    पुणे : मानवी हक्क आयोग हे बिनदातांचे वाघ आहेत. त्यांच्यावर दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च होतात. परंतु त्यांचा मानवी हक्क संरक्षणाचा उद्देश एक टक्काही सफल होत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सर्व मानवी हक्क आयोग बरखास्त करावेत. तसे केल्यास सामान्यांचे कोट्यवधी रूपये वाचतील, असे ठाम मत मानवाधिकार वकिल अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

    मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इंन्सिट्यूट यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

    असीम सरोदे म्हणाले, मानवी हक्क विशेष न्यायालये सुरू करण्यासाठी कायदा पारित झाला. काही ठिकाणी तशी न्यायालयेही सुरू झाली परंतु लोकांना त्याविषयी माहिती नसल्याने त्यांचा वापर होत नाही. लोकअदालतीची जशी जाहिरात केली जाते तशी या न्यायालयांची जाहिरात केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.