मुंबईत २,२०३ गायींना लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लस दिली, महानगरपालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय, तर २४,३८८ म्हैस-वर्गीय जनावरे

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोजातीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत २ हजार २०३ गोजातीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गोजातीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात लम्पी (lumpy) आजाराने थैमान मांडले आहे. लम्पीमुळ जनावारे दगावण्याच्या घटनेत वाढ होत आहे, त्यामुळं शासन पातळीवर यावर उपाययोजन करण्यात येत आहेत. दरम्यान, प्रामुख्याने गोजातीय व म्हैस-वर्गीय (Cows) जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अधिसुचनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाद्वारे महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरिय उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. या उपाययोजना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या सुचनांनुसार पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे राबविण्यात येत आहेत. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोजातीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत २ हजार २०३ गोजातीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गोजातीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

    दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना पठाण यांनी सांगितले की, लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांचे सर्वेक्षण यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या गोजातीय जनावरांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकडे ०२२-२५५६-३२८४ आणि ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधून लसीकरणाबाबत विनंती नोंदवावी.