औरंगजेब बादशहाचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय – अबू आझमी

औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे मत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी व्यक्त केले आहे.

    मुंबई : औरंगजेब (Aurangzeb) यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. औरंगाबादमध्ये देखील अनेकांची औरंगजेब अशी नावे आहेत. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांत तीन नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी मुस्लिम (Muslim) आहेत. औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे मत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी व्यक्त केले आहे.

    अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाप्रमाणे कर्जतमध्ये एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रकरणाचा छडा लावत आरोपींना शिक्षा देण्यात येईल असं म्हटलं आहे. याबरोबरच हिंदूंवरील हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. यावर बोलताना अबू आझमी यांनी देशात मुस्लिम बांधवांवर देखील हल्ले होत असल्याचे स्पष्ट केले.

    हिंदूंवर हल्ला होत आहे, तर मुस्लिम लोकांवरदेखील हल्ले होत आहेत. धर्माच्या नावाने किंवा मंदिर-मस्जिदच्या नावाने भडकवण्याचे काम नारायण राणे यांचे पुत्र करत आहेत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. पण त्यावर बोलण्याऐवजी राणे हे हिंदुत्वाचे राजकारण करत असल्याची टीका अबू आझमी यांनी केली.