प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ‘ते’ व्हिडिओही केले व्हायरल

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात (Fake Love) ओढून तिच्यावर एकाने अत्याचार केला. एकांतातील क्षणातील फोटो आणि व्हिडिओ त्याने अन्य मित्रांना पाठविले. त्यांनीही ब्लॅकमेल करत मुलीचा लैंगिक छळ चालविला होता. या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर खाप्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात (Fake Love) ओढून तिच्यावर एकाने अत्याचार केला. एकांतातील फोटो आणि व्हिडिओ त्याने अन्य मित्रांना पाठविले. त्यांनीही ब्लॅकमेल करत मुलीचा लैंगिक छळ चालवला होता. या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर खाप्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त जमाव खापा पोलिस ठाण्यावर धडकला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी उशिरापर्यंत तणावाची स्थिती कायम होती.

    धीरज हिवरकर, वेदांत आवते, गोलू लिखार, विकास हेडाऊ, लकी धार्मिक अशी आरोपींची नावे असून, सर्व खाप्यातील रहिवासी आहे. पीडित मुलगीही खाप्यातीलच रहिवासी आहे. घटना समोर आल्यानंतर नातेवाईक पीडितेला घेऊन ठाण्यात पोहोचले. प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली. लोकांचा आक्रोश लक्षात घेत पोलिस उपअधीक्षक चांदखेडे यांनी हे प्रकरण आपल्याकडे घेतले.

    आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

    गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाले. आरोपींनी माताखेडी व लांबटपुरा परीसरातील घरात तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेत आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ठाणेदार मनोज खडसे यांनी वर्तविली.

    पीडितेकडे पैशांचीही मागणी

    पीडितेला प्रथम एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढत गैरकृत्य केले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओही कैद केले. पुढे बदनामीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करायचा. त्याने मित्राला फोटो आणि व्हिडिओ पाठविला. अशाच पद्धतीने आरोपींची संख्या वाढत गेली. तिच्याकडे पैशांची देखील मागणी करण्यात आली.

    या संपूर्ण प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. वागणुकीतील बदलामुळे कुटुंबीयांना शंका आली. विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने अश्रूंना वाट मोकळी करून देत आपबिती कथन केली.