अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईसह दोन जणाविरोधात गुन्हा दाखल

राहता पोलिस स्टेशन मध्ये एका खळबळजनक आणि तितकीच संतापजनक असलेल्या घटनेची फिर्याद दाखल झाली असून, जन्मदात्या आईनेच तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला सामाजिक प्रथेचा दाखला देत बळजबरीने एका पुरुषाबरोबर शारीरिक संबंधास भाग पाडले.

    अहमदनगर : राहता पोलिस स्टेशन मध्ये एका खळबळजनक आणि तितकीच संतापजनक असलेल्या घटनेची फिर्याद दाखल झाली असून, जन्मदात्या आईनेच तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला सामाजिक प्रथेचा दाखला देत बळजबरीने एका पुरुषाबरोबर शारीरिक संबंधास भाग पाडले. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या वतीने मामेभावाने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आई आणि एका व्यक्तीला अटक केली आहे. या संतापजनक घटनेबद्दल एकच मोठी खळबळ उडाली आहे.

    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चक्क तिच्या जन्मदात्या आईने सांगितले की तुला आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे ( रा. वेस, ता.कोपरगाव ) याच्या सोबत संबंध ठेवावे लागेल. आईच्या या अजब आदेशाला या शिक्षण घेत असलेल्या मुलीने ठामपणे विरोध करत स्पष्ट नकार दिला. मुलीने नकार देताच आईने मुलीला दटावत आपल्या समाजात हि प्रथा असल्याने असे तुला करावेच लागत असते, तू जर असे केले नाही तर तुझ्याकडे पहावे लागेल, असे म्हणत चक्क बळजबरीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला आबासाहेब रामचंद्र भडांगे नावाच्या इसमाच्या ताब्यात दिले. व ती अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध घरातील एका खोलीत नेऊन आरोपीने दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यासह राहता परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    याबाबत पीडित मुलीच्या वतीने तिचा मामेभाऊ याने राहता पोलिस स्टेशनला १६ सप्टेंबर रोजी मुलीच्या वतीने फिर्याद दाखल केली असून, आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर ४०७/२०२२ भादवी कलम ३७६ (२)( i )( j ), ५०६,३४ बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा कलम ४,६,१६,१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे आणि मुलीची आई दोघांना अटक करण्यात आली असून, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहेत.