सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे भीषण अपघात; टेम्पो-ट्रकच्या अपघातात तीन जण जागीच ठार

सातारा-पुणे महामार्गावरील धनगरवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident in Shirval) झाला. आयशर टेम्पो व ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस स्टेशन येथे झाली आहे.

    शिरवळ : सातारा-पुणे महामार्गावरील धनगरवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident in Shirval) झाला. आयशर टेम्पो व ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस स्टेशन येथे झाली आहे. मोटे वस्ती समोर पुढे उभा असलेल्या टेम्पोला पाठीमागून मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत मालवाहू ट्रकमधील तीन जण जागीच ठार झाले.

    कर्नाटक बेंगलोर येथून शेतीचा माल मुंबई, वाशीकडे घेऊन जाणारा (के.ए. 22 ए. ए. 1551) हा आयशर टेम्पो धनगरवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर रस्त्याच्या कडेला उभे असलेला (के. ए. 53 सी 8343) या ट्रकला पाठीमागे जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला होता. दबले गेलेल्या भागामध्ये गाडीचा ड्रायव्हर व दोन हमाल हे तिघे पूर्णपणे दबले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री झाल्याचे सांगितले जात आहे.

    या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस स्टेशन, शिरवळ बचावपथक हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच धनगरवाडी ग्रामस्थ व शिरवळ ग्रामस्थ यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या अपघातात अडकलेल्या मृतदेह क्रेन जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यास मदत करण्यात आली. या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, मृतदेह बाहेर काढल्यानंतर लगेचच वाहतूक महामार्ग पोलिसांच्या मार्फत सुरळीत करण्यात आली.