रायगडावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या बसला भीषण अपघात

    रायगड : माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत येणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही बस १० ते १५ फूट खाली कोसळली असून यात १० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बस मधील सर्व प्रवासी सहलीसाठी रायगड किल्ल्यावर गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला.

    अपघात झालेल्या बस मधील सर्व प्रवासी हे पुण्याच्या जवळपास भागात राहणारे होते. सर्व प्रवासी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास परतीच्या मार्गावर असताना किल्ले रायगड ते निजामपूर मार्गावरील घरोशीवाडीच्या जवळ या बसचा अपघात झाला. अवघड वळणावर बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली सुमारे १० ते १५ फूट कोसळली. या अपघातात तीन महिला जखमी झाल्या असून इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.