शिक्रापुरात डॉक्टर दांपत्याचा भीषण अपघात; महिला डॉक्टर जागीच ठार तर पती गंभीर जखमी

पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (Dr. Sonali Khaire) यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

    शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (Dr. Sonali Khaire) यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पवन भगवान साठे या ट्रकचालकावर (Pune-Nagar Highway Accident) गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

    शिक्रापूर (ता. शिरुर) येथील खैरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मच्छिंद्र खैरे व डॉ. सोनाली खैरे हे दोघे आज १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या (एमएच १२ एचएन ३६५३) या कारमधून पुणे-नगर महामार्गावरील साई सहारा पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरुन परत येत असताना रस्ता ओलांडण्यासाठी पुणे बाजूकडे येत असताना अहमदनगरच्या बाजूने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची खैरे यांच्या कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये कारचा पुढील निम्म्या भागाचा चेंदामेंदा झाला.

    कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७ ) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    या घटनेबाबत डॉ. कैलास बाळासाहेब बांदल (वय ४५ वर्षे रा. भैरवनाथ शाळेजवळ पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पवन भगवान साठे (वय २५ वर्षे रा. किनी ता. जळगाव जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.