
भरधाव ट्रकने सिग्नलला उभ्या असणाऱ्या कार व दुचाकी वाहनांना उडविले. यानंतर त्या ट्रकने पुन्हा पाच वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे.
पुणे : पुण्यातील नवले पुल परिसरात पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली असून, बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकने सिग्नलला उभ्या असणाऱ्या कार व दुचाकी वाहनांना उडविले. यानंतर त्या ट्रकने पुन्हा पाच वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे.
कात्रजकडून नवले पुलाकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. या अपघातात संदेश बानदा खेडेकर (वय ३४ रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज-कोंढवा रस्ता) यांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालक पंकज राजाराम नटकरे (वय २१ रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने भरधाव ट्रक (केए. ५६. ३१६५) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी सिग्नलला उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरात धडक बसली. यात ४ कार वाहने व एक दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यात दुचाकीस्वार संदेश खेडेकर यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. काही वेळाने या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली.