लग्न सोहळ्याला निघालेल्या इनोवा कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर चालकासह चार महिला गंभीर जखमी

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्याला जाणाऱ्या इनोवा कारचा भीषण अपघात झाला आहे.

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पुणे मुंबई महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्याला जाणाऱ्या इनोवा कारचे डाव्या बाजूचे चाक निघाल्याने कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुणी व जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवारी (दि.२६ ) सकाळी 9:30 वा. अहिरवडे फाटा पुणे-मुंबई महामार्गावर ता.मावळ हद्दीत घडला.

    सिद्धी संतोष तिकोणे (वय १८, रा. पाटण ता.मावळ) व सीताबाई तुकाराम लालगुडे (वय ६० रा. कुसगाव खुर्द ता.मावळ) असे अपघात मृत्यू झाल्याची नावे आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्ला येथे सामुदायिक विवाह सोहळ्याला कार मधून जात असताना, अहिरवडे हद्दीत पुणे मुंबई महामार्गावर कारचा डाव्या बाजूचे समोरचे चाक निघाल्याने कार अनेकदा पलटी होऊन भीषण अपघात झाला.

    या अपघातात सिद्धी तिकोणे व सीताबाई लालगुडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
    अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री भूमकर, पोलीस हवालदार समीर करे व प्रवीण विरणक आदींनी धाव घेतली. जखमींवर पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.