जामनेर-बोदवड रस्त्यावर अपघात; तीन ठार, तीन जण जखमी

जामनेर-बोदवड रस्त्यावर मालदाभाडीजवळ समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने अपघात (Accident News) झाला. या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले.

    जामनेर : जामनेर-बोदवड रस्त्यावर मालदाभाडीजवळ समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने अपघात (Accident News) झाला. या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले.

    मृतांमध्ये वाडीकिल्ला ता. जामनेर येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (वय ४२, रा. मालदाभाडी, ता. जामनेर), सुनिल शांताराम भोई (वय ४५, रा. जामनेर रोड) आणि दत्तू रामा माळी (वय ३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे. सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने जामनेरहून बोदवडकडे निघाले होते. त्यांच्यामागे ईश्वर पारधी हेही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते.

    मालदाभाडीनजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली. यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत.