मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे अपघात; तिघांचा मृत्यू

    रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे झालेल्या भीषण अपघातात ३५ वर्षीय तरुण ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक आणि इर्टिगा कारला रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. विजय विलास सावंत (पुनस-लांजा) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तसेच, कारचालक समीर प्रदीप शिंदे (वय २९) आणि आई सुहासिनी प्रदीप शिंदे (वय ६१) यांचाही मृत्यू झाला आहे. कारमधील शिंदे कुटूंब चिपळूण येथील आहे.

    चिपळूण येथील रहिवासी असलेले शिंदे कुटुंबीय रविवारी रात्री मालवण येथून चिपळूणकडे निघाले होते. तर, ट्रक चालक विजय विलास सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमधून सिमेंट घेऊन रत्नागिरी येथून लांजाकडे येत होते. काजळी नदीच्या पुलावर ट्रक आणि कारचा हा अपघात झाला. अपघातात कारमधील चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रत्नागिरी सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हा भीषण अपघात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने झाला आहे. अपघातस्थळी तात्काळ ग्रामस्थ, लांजा पोलिसांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

    सदर याचवेळी आंजणारी घाट उतरत असताना ट्रक चालक विजय सावंत यांना आपल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. आंजणारी वरचा स्टॉप या ठिकाणच्या तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने आणि याच दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात लक्झरी गाड्यांची रहदारी असल्याने ट्रक थांबवायचा कसा, असा मोठा प्रश्न ट्रक चालक सावंत यांच्यासमोर निर्माण झाला. तरीही मोठ्या शिताफीने त्यांनी ट्रक अंजाणारी पुलापर्यंत आणला. मात्र सिमेंट भरले असल्याने आणि तीव्र उतार असल्याने या ठिकाणी समोर आलेल्या अर्टिगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.