पुणे – मुंबई जुन्या महामार्गावर अपघात; दोघेजण गंभीर जखमी

जुना पुणे मुंबई महामार्गावर हाफकिन कंपनीच्या गेट समोर झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव कारने धडक दिली. याअपघातात कार मधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    पिंपरी : जुना पुणे मुंबई महामार्गावर हाफकिन कंपनीच्या गेट समोर झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव कारने धडक दिली. याअपघातात कार मधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. विठ्ठल लक्ष्मण देवकर (30, रा. स्वारगेट, पुणे), केतन शिवाजी जाधव (32, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास टँकर चालक नवनाथ जेरीथोर हे टँकरने (एमएच 12/डीजी 7027) रत्याच्या बाजूला असलेल्या झाडाला पाणी घालत होते. त्यावेळी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून कार (एमएच 14/डीटी4707) वेगात आली. कार मध्ये चारजण होते. भरधाव कारने टँकरला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये कार मधील दोघेजण गंभीर जखमी झाले.

    अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात कारचालक ईश्वर रामचंद्र कराळे (32, रा. रुपीनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.