टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस यांचा पालघर जवळ अपघाती मृत्यू

पालघर जिल्ह्यातील चारोटी (Charoti, Palghar District) येथील सूर्या नदीवरील पुलाच्या सुरक्षा भिंतीला त्यांची गाडी धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    पालघर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस (Cyrus Mistry) यांचं अपघाती मृत्यू (Accidental Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. ते अहमदाबाद येथून मुंबईला (Ahmedabad To Mumbai) परतत असताना ही घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील चारोटी (Charoti, Palghar District) येथील सूर्या नदीवरील पुलाच्या सुरक्षा भिंतीला त्यांची गाडी धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  पालघर जिल्हा पोलिस अधिकक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    सायरस मिस्त्री यांच्यासोबत त्यांच्या मर्सिडिज कारमध्ये आणखी दोघे जण प्रवास करत होते. त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात दुपारी ३ च्या सुमारास झाला आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती शापूरजी पालोनजी यांचे धाकटे पुत्र होते. युवा उद्योजक म्हणून सायरस मिस्त्री यांची ख्याती होती. काही काळ त्यांनी टाटा उद्योग समूगातील ‘टाटा सन्स’चे प्रमुखपदही सांभाळले होते.

    सायरस मिस्त्री हे अहमदाबाद येथून मुंबईला येत होते, ते त्यांच्या खासगी आलिशान मर्सिडिज गाडीतून येत होते. त्यांच्या सोबत आणखी दोघेजण प्रवास करत होते. ते पालघर जिल्ह्यातील चारोटी फाटा येथे आले असता, त्यांची गाडी येथील सूर्या पूलावारील संरक्षण कठड्याला धडकली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान काही जखमींना येथील दवाखान्यात नेण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला आहे. शिंदे म्हणाले, टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.