‘समृद्धी’ महामार्गावर अपघातांच सत्र सुरूच, कधी अन् कसे झाले अपघात? : वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. शिर्डीहून अमरावतीकडे परतणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावरील विझोरा शिवारात अपघात झाला.

  बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. शिर्डीहून अमरावतीकडे परतणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावरील विझोरा शिवारात अपघात झाला. या अपघातात पती, पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

  गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे सुमित गावंडे, प्रियंका गावंडे आणि ११ महिन्याचा मुलगा वेद अशी आहेत. सुमित गावंडे हे आपली पत्नी प्रियंका व ११ महिन्यांचा मुलगा वेद हे शिर्डीहून कारद्वारे (क्र. एमएच-२७-डीए-४१०४) अमरावतीकडे परत येत होते. विझोरा शिवारात गावंडे यांचा गाडीवरील ताबा सुटला व त्यांची कार समृद्धीच्या चॅनल नंबर ३२६.९ व जाऊन आदळली.

  विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. पण गेल्या रविवारी या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५१० किमीच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. या महामार्गावरून वाहतूक सुरूही झाली. खरं तर या महामार्गाची रचना १५० किमी प्रतितास या वेगानं वाहनं धावू शकतील, अशी तयार करण्यात आली आहे. पण याठिकाणी १२० किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहनं चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्यानं आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलोय, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या पाच दिवसांत फक्त बुलढाण्यातच पाच अपघात झाले आहेत.

  कधी आणि कसे झाले अपघात? 

  १२ डिसेंबर : एक मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन मेहकरजवळ महामार्गावरील कठड्यावर आदळून पलटी झाला, चालक जखमी.

  १२ डिसेंबर : एक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या खाली २० फूट खोल खड्ड्यात पालटला, चालक आणि वाहक जखमी.

  १५ डिसेंबर : रात्री एक कार शिर्डीहून अमरावती कडे जात असताना चालकाला झोप लागल्याने कठड्याला धडकून अपघात, ११ महिन्याच्या बाळांसह तिघे गंभीर जखमी.

  १६ डिसेंबर : एक कार औरंगाबादहुन मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला, दोन गंभीर जखमी, एकजण किरकोळ जखमी.

  १६ डिसेंबर : मुंबईहून एक कार वर्धा कडे जाताना मेहकर नजीक चालकाला झोप आल्याने कार कठड्याला धडकून अपघात , चालक गंभीर जखमी.