वनविभागाच्या निकषानुसार डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यानाची उभारणी करा : पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

पनवेल येथील पांडवकडा धबधबा विकास आराखडा तयार करणे, किहीम येथील विकास कामे आणि पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र आदींबाबतही बैठका पार पडल्या. बैठकीस उपवन संरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

  मुंबई : वनविभागाच्या निकषांचा विचार करुन डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यानाची उभारणी करा, असे निर्देश पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

  मौजे जामगांव, ता. रोहा, जि. रायगड येथील प्रस्तावित उद्यानाबाबत मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी पनवेल येथील पांडवकडा धबधबा विकास आराखडा तयार करणे, किहीम येथील विकास कामे आणि पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र आदींबाबतही बैठका पार पडल्या. बैठकीस उपवन संरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे इको टुरिजम बोर्डाचे चेअरमन विकास गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रदीप कुमार सहभागी झाले होते.

  मंत्री तटकरे म्हणाल्या, 44 हेक्टर क्षेत्रावर अस्तित्वात येणाऱ्या या प्रकल्पासाठी वनविभागाने सल्लागार नेमून प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. सल्लागार नेमल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे सोपे होईल. ज्यांनी यापूर्वी राज्य शासनाकडे संबंधित विषयाबाबत सल्लागार म्हणून काम केले आहे अशांपैकी एक सल्लागार नेमून उद्यानाबाबतचा आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. अनुभवी सल्लागाराच्या मदतीने तयार केलेला सदर प्रस्ताव इको टूरीजम बोर्डाकडे पाठवून पुढील कार्यवाही करता येईल, असेही त्या म्हणाल्या.

  पांडवकडा धबधबा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत निर्देश

  पनवेल येथील पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेला पांडवकडा धबधब्याच्या विकासासंदर्भातील विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी पर्यटन विभागास दिले. पांडवकडा येथे मूलभूत सुविधा देणे हा मूळ उद्देश असून त्यादृष्टीने सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी बैठकीदरम्यान दिले. यावेळी सिडकोचे मुख्‍य नियोजनकार आशुतोष उईके यांनी पांडवकडा प्रकल्पाचे सादरीकरण केले. या बैठकीस सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक – 3, डॉ. कैलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. सिडकोच्या माध्यमातून पांडवकडा प्रकल्पास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

  सिडकोने वनविभागाकडे सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा, वनविभागाने रितसर तपासणी करुन नियमानुसार प्रकल्पास मान्यता द्यावी, प्रकल्पक्षेत्र वनजमिनीत असल्याने त्यासंदर्भात आवश्यक सर्व नाहरकत प्रमाणपत्रे सिडकोस उपलब्ध करुन द्याव्यात, सिडकोने प्रकल्प एजन्सी म्हणून विकसित करावा, आदी निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

  किहीम येथे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अलींचे शिल्प तयार करा
  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या किहीम या जन्मगावी पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राचा आराखडा आणि किहीम येथील विकासकामांबाबतचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. डॉ. सलीम अली यांची ओळख सांगणारी शिल्पे बनवून ती केंद्र परिसरात बसविण्यात यावीत, शिल्प बनविण्याचे काम जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडे देण्यात यावे असे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी दिले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती तयार करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.

  सदर प्रकल्प 5 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. यातील पहिल्या 4 टप्प्यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उभ्या करणे व बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. तर पाचव्या टप्प्यात राज्य शासन आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांच्यात सामंजस्य करार होईल. त्यानंतर या केंद्राचे संचलन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडे जाईल. हे केंद्र अस्तित्वात आल्यास जैवविविधता आणि पक्षीनिरिक्षणाची युवकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा डॉ. सलीम अली यांचे नातलग डॉ. मुराद फते अली यांनी व्यक्त केली. यावेळी देवेंद्र बावधने, राहुल खोत उपस्थित होते. यावेळी बीएनएचएसचे सदस्य बीट्टू सहगल ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले.

  आदीवासी मुलांमधील टॅलेंट हंट ते नर्चरिंगपर्यंत पाठपुरावा करा
  अलिबागच्या आदीवासी मुलांसाठी ॲथलेटीक्स अणि तिरंदाजी प्रतिभा ओळखीच्या प्रस्तावाबाबत ॲडॉप्ट स्पोर्ट क्लबची सादरीकरणाबाबत दालनात बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्यातील आदीवासी समाजातील मुलांमधील खेळातील प्रतिभा शोधून त्यांना चांगल्या सुविधा देता येतील अशी भूमिका ॲडॉप्ट स्पोर्ट क्लबने मांडली.
  अलिबागपेक्षा सुधागड, कर्जत तालुक्यात अधिक आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी क्लबने चाचण्या घ्याव्यात अशा सूचना दिल्या. आदीवासी मुलांमधील टॅलेंट हंट ते नर्चरिंगपर्यंत पाठपुरावा करा, असे निर्देश रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांना दिले. ते ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले हेाते. यावेळी क्रीडा विभागाचे उपसचिव समीर सावंत, ॲडॉप्ट स्पोर्टचे दर्शन वाघ, अभिजीत कुलकर्णी यांनी प्रकल्पाबाबतची माहिती सादर केली.