पोलीस बंदोबस्त असतानाही आरोपी कोरोना उपचार केंद्रातून फरार; या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पालघरच्या जे जे आरोग्य पथकात उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल केले गेले. त्याच्यासोबत त्याचे आणखीन दोन सह आरोपीही येथे उपचार घेत आहेत. हे आरोपी उपचार घेत असल्यामुळे या उपचार केंद्रावर आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी तीन ते चार पोलीस तैनात केले होते.

    पालघर : पालघरच्या आरोग्य पथकातील कोरोना उपचार केंद्रामध्ये (Covid Care Center) उपचार घेत असलेला आरोपी पोलिसांचा कडक पहारा असतानाही त्यांच्या हातातून निसटून गेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच पालघर व परिसरात हा चर्चेचा विषय बनत चालला आहे.

    पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला हा आरोपी गोमांस तस्कर प्रकरणात सहभागी होता. काही दिवसांपूर्वी गोमांस व काही जनावरे बेकायदा पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी या आरोपीला मनोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला काही दिवस पोलिस कोठडी मिळाली व केळवे पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडी मागण्याअगोदर आरोपीला कोरोना निष्पन्न झाल्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली.

    त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पालघरच्या जे जे आरोग्य पथकात उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल केले गेले. त्याच्यासोबत त्याचे आणखीन दोन सह आरोपीही येथे उपचार घेत आहेत. हे आरोपी उपचार घेत असल्यामुळे या उपचार केंद्रावर आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी तीन ते चार पोलीस तैनात केले होते. मात्र पोलिसांची कडक सुरक्षा फळी भेदून त्यांना गुंगारा देऊन या आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत उलट सुलट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

     

    आज (रविवार) पहाटेच्या सुमारास त्याने पळ काढला तेव्हा तेथील पाळतीसाठी तैनात केलेले पोलीस काय करीत होते असा प्रश्न विविध स्तरातून विचारू जाऊ लागला आहे. समाज माध्यमांवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तेथेही पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी पथके स्थापन करून त्याचा शोध घ्यायला मोहीम सुरुवात केली आहे. आता हा फरार आरोपी पोलिसांच्या हाताला लागतो का हे पहावे लागणार आहे.