आरोपीला मृत्यूच्या दोन दिवसांनी मिळाला जामीन ; वैद्यकीय जामीन देण्यास सत्र न्यायालयाला व्यग्रतेमुळे झाला विलंब

न्यायालयाला वैद्यकीय जामीन अर्जावर निर्णय देण्यास विलंब झाल्यामुळे विविध शारिरीक व्याधींनी त्रस्त असलेल्या एका आरोपीला मृत्यूच्या दोन दिवसांनी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे आरोपीची मृत झाल्याची कोणतिही कल्पना न्यायालयाला जामिनाचे आदेश देताना नव्हती.

    मुंबई : न्यायालयाला वैद्यकीय जामीन अर्जावर निर्णय देण्यास विलंब झाल्यामुळे विविध शारिरीक व्याधींनी त्रस्त असलेल्या एका आरोपीला मृत्यूच्या दोन दिवसांनी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे आरोपीची मृत झाल्याची कोणतिही कल्पना न्यायालयाला जामिनाचे आदेश देताना नव्हती. सुरेश दत्ताराम पवार (६२) असे या आरोपीचे नाव असून त्याला वैदयकीय कारणास्तव सहा महिन्याचा जामीन देण्यात आला. मात्र, आदेश येण्याच्या दोन दिवस आधीच पवारांचा मृत्यू झाला होता.

    मालमत्ता एजंट असल्याचे भासवून पवार पती पत्नीने मिळून जवळपास १६ जणांचा फसवून २.४ कोटी रुपये लुटल्याचा आरोपाखाली साल २०२१ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून कारागृहात असलेले पवार मधूमेह, फुफ्फुसांचा आणि मूत्रपिंडाचा आजाराने ग्रस्त होते. सर्व व्याधींवर जेजे रुग्णालय आणि कारागृहात योग्य तो उपचार न मिळाल्यामुळे ३० एप्रिल २०२३ रोजी त्यांचा पाय कापावा लागला. पाय कापल्यानंतरही त्यांना अतिदक्षता विभागात न ठेवता सर्वसाधारण विभागात ठेवण्यात आले. या निष्काळजीपणामुळे पवारांची तब्येत आणखीन खालावली आणि फुफ्फुसांमध्ये नव्याने संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी लागणाऱ्या पोलीस एस्कॉटचा खर्च पवारांना परवडणारा नसल्यामुळे त्यांनी ३ मे २०२३ रोजी वैद्यकीय जामीनासाठी अर्ज केला. ४ मे रोजी अर्जावर तातडीने सुनावणी झाली. तेव्हा, न्यायाधीश विशाल गायकवाड यांनी पवारांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणीदरम्यान, तपास अधिकारी आजारी असल्यामुळे पोलिसांनी सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली.

    ८ मे रोजी अर्जावर सुनावणीदरम्यान, पवारांची तब्येत खालावली असून त्यांची स्थिती गंभीर असल्याचे पवारांच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. त्यांच्या अर्जाला मूळ तक्रारदाराने विरोध केला तर पवारांचा वैद्यकीय अहवाल तयार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेऊन निकाल राखून ठेवला. पुढे दोन दिवस कामातील व्यग्रतेमुळे न्यायालयाला निकालाचे वाचन करता आले नाही. ११ मे रोजी न्यायालयाने पवारांचा अर्ज स्वीकारून त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.