घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीचा ठाकरे गटाशी संबंध? भाजपकडून फोटो शेअर करत आरोप

होर्डिंगचा मालक भावेश भिडे विरोधामध्ये कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र या घटनेवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांचा एकत्रित फोटो शेअर करण्यात आलेला आहे.

    मुंबई : मुंबईला काल अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामध्ये घाटकोपरच्या छेडा नगर येथे सायंकाळी होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. पेट्रोल पंपावर पडलेल्या या होर्डिंगमुळे तब्बल 14 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच 74 जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्य सुरु असून सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. होर्डिंगचा मालक भावेश भिडे विरोधामध्ये कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र या घटनेवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांचा एकत्रित फोटो शेअर करण्यात आलेला आहे.

    घाटकोपरमध्ये पावसामध्ये कोसळलेल्या होर्डिंगचा भावेश भिडे हा मालक आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांक़डून कारवाईचे आदेश देण्यात आले असून सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. भावेश भिडे याच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे त्याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. उद्धव ठाकरे व भावेश भिडे यांचा फोटो राम कदम यांनी शेअर केला आहे. शेअर करताना लिहिले आहे की, “14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे..श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी  4 लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?” असा घणाघात राम कदम यांनी केला आहे.

    यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे म्हणाले, “कालपासून एक माहिती बाहेर येत आहे. ही ज्या संबंधित कंपनीची होर्डिंग होती, तिला मुंबई महानगरपालिकेने आधीच नोटीस बजावली होती. होर्डिंग लावण्याचा कार्यकाळ संपलेला आहे, म्हणून ही होर्डिंग काढून टाकाअशी ही नोटीस होती. तरीही त्या मालकाने काही ऐकलं नाही, मालकाचे नाव भावेश भिडे आहे असं मी ऐकतोय. हा भावेश भिडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊत यांचा भाऊ सुनील राऊत व भावेश भिडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिडेचा मातोश्रीत उद्धव ठाकरेकडे घेऊन जाऊन सुनील राऊत यांनी फोटो काढला होता का? या प्रश्नाचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे याच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.