संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Crime) एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, चौकशीच्या दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संशयित पसार झाला.

    वणी : दिंडोरी तालुक्यातील (Dindori Crime) एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, चौकशीच्या दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संशयित पसार झाला. या प्रकरणातील पीडित युवतीने त्यांच्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील प्रिया खांदवे (वय 20) या युवतीवर गावातीलच ग्रामपंचायत सदस्य व विवाहित उमेश बंडू खांदवे (35) या युवकाने एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद 27 सप्टेंबरला दाखल केली होती. या फिर्यादीवरुन दिंडोरी पोलिसांनी आरोपी उमेश खांदवे यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.

    28 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील साईतीर्थ लॉज अंजनेरी येथे आरोपीला दिंडोरीचे पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, फिर्याद प्रिया खांदवे चौकशीसाठी घेऊन गेले होते. चौकशी पूर्ण होऊन परतत असताना गंगापूर रोड येथील विसे मळा येथे आरोपीने लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितले. त्यावेळी पोलिसांच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला.

    दिंडोरी पोलिसांत प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार

    30 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रिया खांदवे ही घरातल्यांसोबत घरात झोपली होती. सकाळी चार वाजेच्या सुमारास प्रियाच्या आईला जाग आली असता प्रिया घरात नसल्याचे लक्षात आले. त्यावरुन दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांच्याच शेतातील विहीरीत प्रियाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.