Accused of killing young girl sentenced to life imprisonment

मृतक रुपाली हिचा मृतदेह आरोपी गजाननच्या खोलीत सापडणे आणि आरोपीच्या अंगावरील कपड्यांवर रुपालीच्या रक्तगट सापडणे आणि आरोपीजवळून जप्त केलेल्या चाबीने त्याच्या खोलीत कुलुप उघडण्यात आले होते. या संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी गजानन यादवविरुध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा सिध्द झाला.

    अमरावती : एका तरुणीच्या हत्याप्रकरणातील आरोपीला जिल्हा न्यायाधीश (क्रमांक २) विशाल एस. गायके यांच्या न्यायालयाने २० मे रोजी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. गजानन महादेव यादव (५०, रा. जिजाऊ नगर, वरुड, मुळ गाव पेठ मांगरुळी) असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना १ डिसेंबर २०१८ रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

    विधी सुत्रानुसार, वासुदेव विठोबाजी बावस्कर (रा. बहादा, ता. वरुड, अमरावती) यांची मुलगी रुपाली (२०) वरुड येथील कॉलेजमध्ये शिकत होती. त्यावेळी वासुदेव हे वरुड येथील सोनारे सरांकडे मजूरीचे काम करीत होते. त्यावेळी सोनारे यांच्याकडे मुनिमजीचे काम करणाऱ्या गजानन यादवशी वासुदेव बावस्कर यांचा परिचय झाला. त्यानंतर गजाननचे वासुदेव बावस्कर यांच्याकडे येणे – जाणे सुरु झाले. त्यामुळे गजाननची रुपालीसोबत ओळख झाली आणि त्यानंतर दोघांची मोबाईलवर चॅटींग सुरु झाली. तसेच गजानन हा रुपालीला दुचाकीवर बसून फिरत सुध्दा होता. गजानन हा वरुड येथील जिजाऊनगरात भाड्याने राहत असल्यामुळे ती त्याला भेटायला जात होती.

    दरम्यान १ डिसेंबर २०१८ रोजी वासुदेव व त्यांचा मुलगा कामावरून दुपारी घरी आल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की, रुपाली बॅकेत पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर घरी परतली नाही. त्यामुळे वडिल वासुदेव यांचा शोध सुरु केला असता, रुपालीचा खून झाल्याची माहिती वासुदेव यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी मुलाला घेऊन गजाननच्या घरी गेला. त्यावेळी रुपालीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला, तसेच बाजुलाच रक्ताने माखलेला चाकू पडून होता. दरम्यान तक्रार नोंदविण्यापूर्वीच वरुड पोलिसांना कळमेश्वर पोलिसांनी माहिती दिली की, गजानन हा घाबरलेल्या स्थितीत पोलिस ठाण्यात आला असून, त्याने रुपालीची बावस्करचा खून केलेला आहे.

    या माहितीच्या आधारे वरुडचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुजित कांबळे यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी गजाननच्या खोलीत रुपाली ही मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणाच्या तपासात निष्पन्न झाले की, गजाननची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो एकटाच वरुडमध्ये राहत होता. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गजानन यादवविरुध्द गुन्हा नोंदवून, त्याला अटक केली.

    परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपीचा गुन्हा सिध्द

    या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर वरुड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल दिलीप तिवारी यांनी न्यायालयात एकूण १२ साक्षीदार तपासले. यापैकी एकही साक्षीदार फितुर झाला नाही. सदर प्रकरणात कोणतेही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पुरावा आढळून आला नाही.

    परंतु, मृतक रुपाली हिचा मृतदेह आरोपी गजाननच्या खोलीत सापडणे आणि आरोपीच्या अंगावरील कपड्यांवर रुपालीच्या रक्तगट सापडणे आणि आरोपीजवळून जप्त केलेल्या चाबीने त्याच्या खोलीत कुलुप उघडण्यात आले होते. या संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी गजानन यादवविरुध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा सिध्द झाला. त्यावरून न्यायालयाने आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एएसआय राजेंद्र बायस्कर व पोलीस  कर्मचारी अरुण हटवार यांनी कामकाज पाहिले.