कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला; पुण्यात खळबळ

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

    पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लीलाकरला पुणे पोलिसांंनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.

    चार दिवसांपूर्वी स्वाती मोहोळ यांच्याविषयी शिवीगाळ करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद मोहोळ यांच्या खूनामधील कट कारस्थान लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

    सायबर पोलिसांनी त्याला ९ फेब्रुवारीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री त्याने छातीत खूप दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना तो बंदोबस्तावरील पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.