Accused sentenced to death for kidnapping and murder of seven-year-old child from Kothurne village in Maval

  वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत खून केल्याची घटना २ ऑगस्ट २०२२ रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. २२) शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्याच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (रा. कोथुर्णे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

  अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक

  मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे २ ऑगस्ट २०२२ रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली होती.

  आरोपीला फाशीची शिक्षा

  या प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अंतिम सुनावणी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्याचे या सुनावणीकडे लक्ष लागले होते.

  खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

  तेजस दळवी याच्या आईचादेखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.