मोबाईल, पैसे चोरणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पोलिसांनी नाकाबंदी करत केली अटक

दुचाकी (Bike) स्वाराला मारहाण करून, त्याच्या खिशातील मोबाईल व पैसे चोरून पळालेल्या आरोपीला ओतूर पोलिसांनी (Police) नाकाबंदी करून अटक केली. ही घटना शनिवारी ता. २८ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत घडली.

    ओतूर : दुचाकी (Bike) स्वाराला मारहाण करून, त्याच्या खिशातील मोबाईल व पैसे चोरून पळालेल्या आरोपीला ओतूर पोलिसांनी (Police) नाकाबंदी करून अटक केली. ही घटना शनिवारी ता. २८ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत घडली.

    या आरोपीला ओतूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक चोरीची दुचाकी, विवो कंपनीचा मोबाईल व पाचशे रूपये हस्तगत केले आहे. गणेश बाळासाहेब पानसरे, (वय ३१ रा.ओतूर पानसरेपट, ता. जुन्नर ) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत विजय शिवाजी केदार (वय ३७, रा. डिंगोरे, ता. जुन्नर ) यांनी ओतूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. तसेच गणेश पानसरेकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून ही दुचाकी संपत देवराम वाघ, (रा. रांजणी, गडदेवस्ती, ता. आंबेगाव ) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके ,पोलीस नाईक सुरेश गेंगजे व पोलीस हवालदार बाळशिराम भवारी यांनी केली.