आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणे हा ‘हलकटपणा’; राऊतांचा शेवाळेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांमुळे फुटीर लोक किती खाली गेले ते समोर आले. मात्र, हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्याने पडेल, असेही संजय राऊत यांनी भाकित केले. शिवसेना शिवसैनिक अशा गोष्टींनी खचणार नाही. त्यांचे राज्य औट घटकेचे राहिल. लोकांमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या आमदारांबाबत लोकक्षोभ असल्याने हे चालले आहे, असेही राऊत म्हणाले.

  नवी दिल्ली : सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने उभे केले. मात्र, सीबीआयसह (CBI) तपास यंत्रणांनी आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. तसेच, ज्यांच्यावर बलात्कार, विनयभंगासारखे आरोप असणाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) आरोप केले, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. संसदेत राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केलेल्या आरोपांवरून राऊत यांनी समाचार घेतला.

  आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांमुळे फुटीर लोक किती खाली गेले ते समोर आले. मात्र, हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्याने पडेल, असेही संजय राऊत यांनी भाकित केले. शिवसेना शिवसैनिक अशा गोष्टींनी खचणार नाही. त्यांचे राज्य औट घटकेचे राहिल. लोकांमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या आमदारांबाबत लोकक्षोभ असल्याने हे चालले आहे, असेही राऊत म्हणाले. २०२४ साली जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सर्वांचा हिशोब होईल. २०१९ ला हिशोब झाला नाही, तो २०२४ला होईल. हे मी ऑनरेकॉर्ड बोलतोय. त्याबद्दल माझ्यावर काय कारवाई करायची ती आता करा, असे आव्हानच संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिले.

  पक्ष कधी संपत नसतात. ज्यांची मूळ खोलवर रुजली आहेत ती संपत नसतात. काही स्वार्थी आणि बेईमान लोकं सोडून जातात म्हणजे पक्ष संपला असे होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेना आघाडीची सत्ता येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा पाहू. तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

  एकनाथ शिंदे, दादासाहेब भुसे, उदय सामंत जवळचे होते. संकटाच्या काळात जे पक्षासोबत असतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात. त्यांची मजबुरी होती, ते काही लोकनेते नव्हते. पक्षाने पदे दिली म्हणून ते मोठे झाले होते. नाही तर ते कोण आहेत? हकालपट्टी करेपर्यंत कोणी त्यांना ओळखतही नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला.

  तिकडे कर्नाटक सरकार आक्रमक झाले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत; अन् आपल्या मुख्यमंत्र्यांना राजकीय पक्षातील लोकांना फोडण्यातच इंटरेस्ट आहे. फोडाफोडी करणे म्हणजे राज्य चालवणे नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

  हे सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आले. हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्यानेच पडेल. आमची माणसे फोडली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. जे हा खेळ करत आहेत. त्यांचे राज्य औटघटकेचे आहे. त्यांचे राज्य औटघटकेचेच राहील आणि या सर्वांना पश्चात्ताप होईल, असेही त्यांनी सांगितले.