महाबळेश्वर पालिका हद्दीतील वेण्णालेक – लिंगमळा परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई

दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, रस्ता रोको करत वाहने अडवली : स्थानिकांच्या रेट्यामुळे प्रशासनाकडून १५ दिवसाची मुदत

  महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील वेण्णालेक व लिंगमळा परिसरातील वेण्णा नदी पात्रात व पात्रालगत स्थानिकांनी केलेले अतिक्रमण विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामे गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासन,महसूल विभागाने संयुक्तिक कारवाईने हटविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याने या भागामध्ये एकच खळबळ माजली परंतु स्थानिकांनी एकत्रित येत महाबळेश्वर पांचगणी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत रस्ता रोको केला तर दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला परिस्थितीचे गंभीर लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर ही कारवाई दोन आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला

  या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम,तहसीलदार तेजस्वनी पाटील पालिका प्रशासक योगेश पाटील व पोलीस निरीक्षक संदीप भागवत पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे या प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस व पालिका कर्माचारी असा मोठा फौजफाटा व यंत्रसामग्री होती.

  गेल्या अनेक दिवसांपासून वेण्णानदी पूर नियंत्रण रेषेलगत असलेल्या अनेक विनापरवाना बांधकाम प्रशासनाच्या रडारवर होते अश्यातच मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभव येथे झालेल्या एका बैठकीत महाबळेश्वर तालुक्यातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील विनापरवाना बांधकामांचा सर्वे केला मोठ्या पोरामनावर करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली व त्यानुसार कारवाईचे नियोजन करून कारवाईस सुरुवात करण्यात आली पहिल्या टप्प्यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल सील करण्यात आले पहिल्या कारवाईत राहिलेल्या त्रुटी वगळून दुसऱ्या टप्यातील कारवाईस प्रारंभ करण्यात आला यासाठी जिल्हा प्रशासनाने वेण्णालेक व लिंगमळा परिसरात कोणतीही परवानगी न घेता नव्याने उभ्या राहत असलेल्या पाच इमारतींची कारवाईसाठी निवड करण्यात आली या यादीनुसार आज सकाळी भल्या पहाटे मोठ्या फौजफाट्यासह कारवाईस सुरुवात करण्यात आली एकाच वेळी स.नं ७१/१ चे शांताराम गणपत बावळेकर व स.नं.१७ चे जे.बी.पाटील यांच्या दोन्ही इमारतींवर पाडण्याची कारवाई सुरु करण्यात आली.

  दोन तासांच्या कारवाई नंतर या परिसरात लिंगमला व मेट गुताड परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली या नागरिकांनी बांधकामांवरील ही कारवाई थांबविण्याची मागणी केली परंतु प्रशासन ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते मागणी करून देखील कारवाई थांबत नसल्याने नागरिकाना संताप अनावर झाला त्यांनी महाबळेश्वर पांचगणी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत रस्त्यावरील वाहतूक रोखत प्रशासनाच्या विरोधात घोषणा सुरु केल्या रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूस वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर पोलिसांनी लिंगमळा येथून महाबळेश्वरकडे येणारी वाहतूक वळवली तर बसवेश्वर चौकातून पांचगणी कडे जाणारी वाहतूक भेकावलीच्या दिशेने वळवली त्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी शिथिल झाली तरी देखील प्रशासन कारवाई थांबवत नसल्याचे पाहून प्रशांत बावळेकर व सुनील बावळेकर यांनी अंगावर डिझेल ओतून नदीपात्रात आत्मदहन करण्याचा प्रयन्त केला अन प्रशासनाची धावपळ सुरु झाली व गोंधळ झाला प्रसंगावधान राखून नर्गिकनी या दोघांना आत्मधनापासून परावृत्त केले या गोंधळामुळे प्रशासनावर दबाव वाढला व त्यांनी वरिष्ठांसोबत सल्लामसलत सुरु केल्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर संतोष आबा शिंदे संजुबाबा गायकवाड अफझल सुतार शरद बावळेकर ऍड संजय जंगम नासिर मुलाणी सतीश ओंबळे राजेंद्र राजपुरे रोहित ढेबे दत्तात्रय वाडकर आदी राजकीय नेते यांनी मुख्यमंत्री,पालकमंत्री,खासदार व जिल्हाधीकारी यांच्यासमवेत संपर्क साधण्याचा प्रयन्त करत होते मात्र कुठूनही प्रतिसाद मिळत नव्हता अखेर जिलाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासनाने ज्या पाच मिळकत धारकांवर कारवाई करण्यात येणार होती त्या मिळकत धारकांची बंद दाराआड बैठक घेतली या बैठकीत प्रांत राजेंद्र कुमार जाधव तहसीलदार तेजस्विनी पाटील पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील तर परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन असलेले उपिभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक संदीप भागवत हे बैठकीस उपस्थित होते या दोन तास बंद दाराआड सुरु असलेल्या या बैठकीत पंधरा दिवसात ही विनापरवाना बांधकामे काढून घेऊ या लेखी हमीवर प्रशासनाने सुरु केलेली ही कारवाई थांबविण्यात आली.

  महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असून येथील पर्यावरणाच्या रक्षणासाठी कडक नियम असून पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवुन येथील बांधकामावर देखील कडक निर्बंंध घालण्यात आले आहे कोणालाही बांधकाम परवाणगी मिळत नाही त्या साठी मोठया अग्नी दिव्यातुन जावे लागते बेकायदेशीर बांधकाम व विनापरवाणा वृक्षतोड यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने येथे अनेक कमिट्यांची स्थापन करण्यात आल्या आहेत हेरीटेज व उच्च स्तरिय सनियंत्रण समिती यापैकी आहेत असे असले तरी पालिकेचे काही अधिकारी व लोकप्रतिनिधी नियमातील पळवाटांचा आधार घेवून ”सेटिंग”करताना पाहावयास मिळतात अनधिकृत बांधकामाची माहीती मिळुनही कोणीही बेकायदेशीर बांधकाम थांबवित नाही किंवा बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यास जाब विचारत नाही जास्तच बोंब झाली तर एखादी नोटीस अथवा दिखाव्यासाठी एखादा गुन्हा दाखल केला जातो गेली अनेक वर्षा पासुन येथे हे असेच चालले आहे अधिकाऱ्यांची खिसे गरम करण्याची प्रवृत्तीमुळे बेकायदेशीर बांधकामे व वृक्षतोडीच्या घटना वरचेवर उघडकीस येतच असतात त्यामुळे प्रशासनाचा वचक राहिलाच नाही परिणामी महाबळेश्वर तालुक्यात बेकायदा बांधकामे बोकाळळी आहेत या बेकायदा इमारतींमध्ये सुरु असलेल्या व्यवसायांमुळे अधिकृत रित्या प्रामाणिकपणे कर भरून हॉटेल व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर उपासमारीची वेळ अली आहे.

  स्थानिकांच्या बांधकामावर हातोडा साठी तत्पर असलेले अधिकारी मात्र धनिकांच्या बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत महाबळेश्वर तालुक्यात आज देखील अनेक ठिकाणी बेकायदा व अनधिकृत बांधकामे जोमात सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची देखील चर्चा यावेळी नागरिकांमधून होत होती.

  महाबळेश्वर तालुक्यामध्ये विनापरवाना व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या हॉटेल रिसॉर्ट व्यवसाधारकांकडून बाहेरील काही स्वयंघोषित ”दादा’लोक लाखो रुपयांचा ”प्रोटेक्शन मनी” गोळा करण्याचा बेकायदेशीर धंदा करत असल्याची चर्चा देखील होती तसेचज इतर तालुक्यातील काही तथाकथित पत्रकार मंडळी अश्या बेकायदेशीर मिळकतधारकांना खंडणीसाठी वेठीस धरत असल्याच्या अनेक तक्रारी आज ऐकण्यास मिळाल्या.