वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; आळेफाटा पोलिसांनी वसूल केला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

आळेफाटा पोलिसांनी वर्षभरात वाहन चालकांकडून सुमारे ३८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासाठी पोलिसांनी सात हजार ४३७ वाहनांवर कारवाई केली.

    पुणे : आळेफाटा पोलिसांनी वर्षभरात वाहन चालकांकडून सुमारे ३८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासाठी पोलिसांनी सात हजार ४३७ वाहनांवर कारवाई केली. पोलिसांनी एक जानेवारी २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

    कारवाईत दुचाकीस्वार यांनी हेल्मेट न वापरणे, चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांची सर्वात जास्त संख्या आहे. वर्षभरात मालवाहतूक वाहनात प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने ५०४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ट्रिपल सीट प्रवास करताना आढळून आल्याने ८५६ वाहनचालकांकडून ८५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त चारचाकी वाहनात सीट बेल्ट न वापरणाऱ्या दोन हजार ५३६ वाहन चालकांकडून पाच लाख ५० हजार रुपये, ५३६ वाहनचालकांनी त्यांची वाहने धोकादायकरीत्या रोडवर उभी केल्याने त्यांना ३२ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

    काळी काच असणाऱ्या १४१ वाहनांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लायसन्स न बाळगणाऱ्या ८७८ वाहनचालकांकडून चार लाख ७५ हजार दंड वसूल केला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १८० वाहन चालकांविरुद्ध तसेच धोकादायकरीत्या रोडवर वाहन लावणाऱ्यांवर २०० गुन्हे दाखल केले आहेत. आळेफाटा पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.

    सुरक्षित प्रवासासाठी सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. यामध्ये दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावा, चारचाकी वाहन चालकाने सिट बेल्टचा वापर करावा तसेच वाहन चालकांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन न करता ड्रायव्हिंग करावी, लायसन्स काढून घ्यावे.

    - यशवंत नलावडे, पोलिस निरीक्षक आळेफाटा.