Action under 'MPDA' against the accused

    पुणे : सदाशिव पेठेत भल्या सकाळी महाविद्यालयीन तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. वर्षभरासाठी त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    आतापर्यंत शहरातील ६० गुंडांवर एमपीडीए कारवाई

    पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ६० गुंडांवर एमपीडीए कारवाई केली आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०, रा. डोंगरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. जाधवने सदाशिव पेठेतील पेरुगेट चौकी परिसरात एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला होता.

    दोन महिन्यांनी जामीन मिळवून बाहेर

    पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयातून तो दोन महिन्यांनी जामीन मिळवून बाहेर आला. जाधव जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्याने पुन्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणीला संपर्क साधत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या ५ वर्षांत त्याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव विश्रामबाग पोलिसांकडून तयार करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली.