बेशिस्त वाहन चालकांना चाप; अवघ्या दीड महिन्यात २१ हजार जणांवर कारवाई

वाहतूक कोंडीतून वाट काढत पुढे जाणाऱ्या पुणेकरांना अधून-मधून बेशिस्त वाहन चालकांचाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या बेशिस्तांना 'चाप' लावण्यासाठी कंबर कसली आहे.

  पुणे : वाहतूक कोंडीतून वाट काढत पुढे जाणाऱ्या पुणेकरांना अधून-मधून बेशिस्त वाहन चालकांचाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या बेशिस्तांना ‘चाप’ लावण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, बेशिस्तांची संख्या वर्षाला वाढत आहे. त्यातही शाळकरी मुले अन् टवाळखोरांकडून ट्रिपलशीट, मॉडीफाय सायलेन्सर तसेच अल्पवयीन दुचाकी चालक हे सुसाट धावत असल्याचे चित्र आहे. त्यावर वाहतूक पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.

  केवळ दीड महिन्यात तब्बल २१ हजार २२८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात सिग्नल जंम्पीगची कारवाई सर्वाधिक असून, त्याखाली ट्रिपलशिट वाहन चालकांचा क्रमांक लागत आहे. मुंबईनंतर पुण्यातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. शहरात मेट्रो, ओव्हरब्रिजची कामं व वाढत्या वाहन संख्यामुळे त्यात आणखीनच भर पडत आहे. वाहतूक कोंडीसोबत सर्वसामान्य पुणेकरांना बेशिस्त वाहन चालकांचाही ‘ताप’ सहन करावा लागतो.

  पुणे शहरात सकाळी आणि सायंकाळी ठरावीक वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक संत गतीने असते. वाहतूक पोलीस चौकात उभा न राहता चौकाच्या पुढे उभे राहून कारवाई करताना पाहिला दिसतात. पालिकेकडून देण्यात आलेल्या वार्डनवर चौकाचा कारभार सोडून वाहतूक पोलीस अनेक ठिकाणावरून गायब असतात. मात्र, या वॉर्डनला बेशिस्त वाहन चालक मात्र भाव न देता त्यांच्यासमोरूनच वाहने दामटत असतात. बहुतांशवेळा अशा बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत देखील भर पडते आणि अपघातालाही निमत्रंण मिळते.

  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाहतूक कोंडीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले होते. त्यानूसार, त्यांनी कामही सुरू केले आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांवर चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. त्यानूसार, विविध भागात कारवाई सुरू केली आहे.

  पोलीस व महापालिका आयुक्तांची बैठक…

  पुणे शहरातील वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस व महापालिका आयुक्तांची नुकतीच बैठक पार पडली. ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे रस्त्यांवरील अशास्त्रीय व वाहतुकीला अडथळा ठरणारे गतीरोधक काढणे, विकास कामांच्या ठिकाणी अनावश्यक बॅरिकेडिंग कमी करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, यासह विविध विषयांवर या बैठकीत प्राथमिक चर्चा केली आहे. या आठवड्यात बुधवारी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. यावेळी उपाययोजनांबाबत चर्चा करून त्यावर कार्यवाही सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

  प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना शिस्तीची गरज…

  पुणे शहरात पालिकेसह खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. रिक्षा, सिक्स सिटर रिक्षा तसेच चारचाकी असे वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावताना दिसतात. परंतु, या वाहन चालकांवर देखील वाहतूक पोलिसांना लक्ष ठेवावे लागेल. त्यातही रिक्षा चालक अत्यंत बेशिस्तपणे वाहने चालविताना आणि पार्किंगच्या ठिकाणी उभे असल्याचे चित्र आहे. तसेच पीएमपी बस देखील मध्येच कुठेही प्रवासी घेत बस उभ्या केल्या जातात. त्यासोबतच सिक्स सिटर रिक्षाही अशाच पद्धतीने दिसून येतात. त्यामुळे पोलिसांना याकडे गांर्भियाने पाहवे लागणार आहे.

  • दीड महिन्यातील कारवाई
  • ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह– ११७ केसेस
  • राँग साईड– २६२७
  • प्रवासी बसेस कारवाई- १५६
  • सिग्नल जंम्पीग- ९७१
  • ट्रिपल शिट- ३१७८
  • मोबाईल टॉकिंग- २८३५
   मॉडीफाईड सायलेन्सर- २४३६
  • रॅश ड्रायव्हींग- २४
  • अल्पवयीन चालक- ३४