महायुतीविरोधात प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करणार; अमित ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका

देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    पुणे : देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याविषयी अमित ठाकरे यांना विचारले असता,‘ वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचे आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.

    मुंबईतील लोकसभेच्या जागांबाबतही त्यांनी भाकीत केले. उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्याविरोधात वातावरण आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भाजप लोकसभेला मनसेसाठी एक जागा सोडेल, अशी चर्चा होती. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढवतील, असे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतरही शक्यता मावळली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

    अमित ठाकरे आणि माेहाेळ यांची भेट

    महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. पुण्यातही मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आणि जोमाने मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहतील, प्रचारात सक्रिय होतील,’ असा विश्वास अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना दिला. या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.