लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार; मंत्री अब्दुल सत्तार यांचा इशारा

विविध कारणे देऊन लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे. येवला येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असताना ते बोलत होते.

    येवला : विविध कारणे देऊन लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे. येवला येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असताना ते बोलत होते.

    सध्या राज्यात गणपती आगमनाने सणासुदीचा काळ आहे. या काळात लिलाव बंद ठेवणे अयोग्य आहे. जे व्यापारी लिलाव बंद ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश आपण पणन आयुक्त व नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही यावेळी सत्तार म्हणाले.

    व्यापाऱ्यांचे काही प्रश्न राज्य व काही केंद्र शासनाच्या संबंधित आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र शासनाचा आहे. त्यासंदर्भात चर्चेसाठी बोलवले असूनही बंद पुकारणे चुकीचे आहे. गणेशोत्सवासारखा सण सुरू असताना शेतकऱ्यांना वेठीस धरण्याच्या हेतू काय, असा सवाल करून चर्चा होणार असताना अचानक बंद पुकारणे चूक असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन विभागाने दिले आहेत.

    उर्वरित कांदा अनुदानास राज्य सरकार बांधील

    दरम्यान, नाफेडची कांदा खरेदी बंद नसून, केंद्र शासनाने जे उद्दिष्ट दिले ते पूर्ण न झाल्याने खरेदी सुरू आहे. जर कुठे कांदा खरेदी बंद असेल तर ती सुरू करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंती करू. शेतकऱ्यांचा पूर्ण कांदा खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ४६५ कोटी रुपये आम्ही दिले असून, अजूनही ४०० कोटी रुपये लागणार आहे. त्यासाठी देखील सरकार बांधील आहे.