MBBS fraud of Rs 20 lakh in the name of admission, racket in the name of medical admission

पालक गर्भश्रीमंत असणार याची त्यांना जाणीव असते. त्यांना शब्दच्छल करून पाल्यांच्या भविष्याचे मृगजळ दाखवत रॅकेटमधील भामटे आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतर १५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत ॲडमिशनचा खर्च येईल, प्रारंभी परराज्यात ॲडमिशन होईल, असे सांगितले जाते.

  भंडारा : अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल मेडिकल कॉलजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून भंडारा शहरातील विद्यार्थ्याची २० लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भंडारा मुंबईच्या दोन भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. भंडारा शहरातील सहकारनगर येथील प्रकाश गुलदास चोहले (५१) यांनी मुलीच्या एमबीबीएसच्या ॲडमिशन करण्यासाठी गुगलवर कॉलेज बाबत माहिती शोधली. तेव्हा त्याचा संपर्क विजय अग्रवाल नावाच्या व्यक्तीशी झाला. तेव्हा ते मुंबईला गेले.

  विजय अग्रवालने अभय कुमार या व्यक्तीचा नंबर देऊन त्याच्याशी ॲडमिशन प्रोसेजर व पैशाबद्दल चर्चा करून आम्हीच महाराष्ट‌्रात एमबीबीएसचे ॲडमिशन करतो असे खोटे सांगून अनुसूचित जाती कोट्यातून ॲडमिशन करून देतो म्हणून प्रकाश चोहले यांच्याकडून २० लाख घेतले. त्यांना अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख मेमोरीयल मेडिकल कॉलेजचे खोटे अपॉयमेंट लेटर देऊन कॉलेजच्या डीनचे खोटी सहीचे पत्र दिले. यानंतर प्रकाश चोहले यांनी अमरावती येथे जावून चौकशी केली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी दोन्ही भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही भामटे फोन उचलत नसल्याचे दिसले. या प्रकरणाची तक्रार त्यांनी भंडारा पोलिस ठाण्यात केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रहाटे करीत आहेत.

  मृगजळ दाखवत ओढतात जाळ्यात
  सोशल मीडियावर ‘ह्यचूज युवर’ करिअर या सारख्या जाहिराती टाकून किंवा प्रत्यक्ष फोन करून हे रॅकेट संबंधित पालकांना आकर्षित करतात. सर्वाधिक ॲडमिशन फी मेडिकलची (एमबीबीएस) असल्याने आपल्याशी संपर्क करणारे पालक गर्भश्रीमंत असणार याची त्यांना जाणीव असते. त्यांना शब्दच्छल करून पाल्यांच्या भविष्याचे मृगजळ दाखवत रॅकेटमधील भामटे आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतर १५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत ॲडमिशनचा खर्च येईल, प्रारंभी परराज्यात ॲडमिशन होईल, असे सांगितले जाते. नंतर आपल्याच राज्यात ॲडमिशन करून देतो, अशी थाप मारून हे भामटे मेडिकलच्या सीटची किंमत वाढवून पाच-दहा लाख रुपये जास्त उकळतात.

  मानाची सलामी समजून प्रभावित
  त्या कॉलेजमधील शीर्षस्थ आपले एकदम खास आहेत, आपल्याशिवाय ते दुसऱ्या कुणाशी आर्थिक व्यवहाराची अथवा प्रवेशाची गोष्ट करीत नसल्याचे सांगितले जाते. खूपच चिकित्सक वृत्तीचे पालक असल्यास आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करतो, असे म्हटल्यास त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात बोलवून घेतले जाते. कटकारस्थानाचा एक भाग म्हणून रॅकेटमधील सदस्य संबंधित शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये आधीच जाऊन तेथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांशी आधीच ओळख करून घेतात. छोट्या मोठ्या कामासाठी शंभर – दोनशे रुपये त्यांच्या हातात ठेवतात. त्यामुळे हा भामटा दिसताच संबंधित दोन – तीन कर्मचारी त्यांना नमस्कार करतात. सावज म्हणून ज्या पालकांना जाळ्यात ओढले असते, ते भामट्यांना मिळणारी मानाची सलामी समजून प्रभावित होतात. नंतर आपला मुलगा – मुलगी डॉक्टर बनणार, या एकाच कल्पनेने हुरळलेल्या पालकांना पुढे काही विचार करण्याची गरजच भासत नाही आणि रॅकेटमधील भामट्याने सांगितल्याप्रमाणे रोख स्वरूपात रक्कम त्याच्या हवाली करतात.