Pune burglary case
Pune burglary case

  पुणे : शहरातील विविध भागांत घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून साडेबारा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वीचे १२ गुन्हे दाखल आहेत.

  या पोलिसांकडून कामगिरी

  संतोष किसन शिलोत (वय ३५, रा. नांदेडगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे, सहाय्यक निरीक्षक निंबाळकर, पोलीस हवालदार धिरज पवार, निशिकांत सावंत, हरी गायकवाड, सोमेश्वर यादव यांच्या पथकाने केली आहे.

  पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार

  संतोष हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वीदेखील अटक करण्यात आली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी एरंडवणा भागातील पटवर्धन भागातील एका बंगल्यात लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने व रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला होता.

  संतोष शिलोत याच्याकडून घरफोडी

  याप्रकरणी अनिल नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही तसेच रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. तेव्हा बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संतोष शिलोत याने घरफोडी केली असून, तो त्याच्या घरी थांबलेला आहे.

  राहत्या घरातून सापळा रचून घेतले ताब्यात

  त्यानुसार, पथकाने त्याला राहत्या घरातून सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर त्याला अटक केली. सखोल तपासात त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने व साडे तीन लाखांची रोकड असा एकूण १२ लाख ५३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.