आदित्य आणि उद्धव ठाकरेंना दिल्ली हायकोर्टाचा मोठा धक्का, मानहानीच्या याचिके प्रकरणात समन्स जारी, कुणी दाखल केलीये याचिका?

दिल्ली हायकोर्टानं (Delhi High Court) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांच्या एका याचिकेवरुन कोर्टानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स जारी केलं आहे.

नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टानं (Delhi High Court) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या एका याचिकेवरुन कोर्टानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स जारी केलं आहे. राहुल शेवाळे यांनी या तिघांविरोधात बदनामी केल्याचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे.

काय आहे प्रकरण ?

ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातून छापण्यात आलेल्या एका लेखावरुन राहुल शेवाळे यांनी सामना या दैनिकाच्या विरोधात बदनामीची नोटीस जारी केली आहे. ही नोटीस संबंधित पत्रकार आणि संपादक या दोघांनाही पाठवण्यात आलीय. या लेखात राहुल शेवाळे हे पाकिस्तानात असलेल्या कराचीतील एका हॉटेलचे मालक असल्याच्या दावा करण्यात आलाय. तर सामना दैनिकात आपल्याविरोधात तथ्यहीन बातमी प्रकाशित करण्यात आल्याचं राहुल शेवाळेंचं म्हणणं आहे. या वृत्तामुळं सामाजिक प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत, शेवाळे यांनी सामना दैनिकाविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

शेवाळेंवर बलात्काराचेही आरोप

गेल्या वर्षी दुबईत काम करणाऱ्या एका महिलेनं शेवाळे यांच्याविरोधात दुष्कृत्य केल्याचा आरोपही केला होता. या प्रकरणात शेवाळे यांना नोटीस जारी करण्यात आली होती. फॅशन डिझायनर असलेली ही महिला 2020 साली दोघांच्या कॉमन फ्रेंडमुळं एकमेकांच्या संपर्कात आल्याचा दावा करण्यात आलाय. 2020 पासून लग्न करण्याचं आमिष दाखवून राहुल शेवाळे यांनी या महिलेसोबत दुष्कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.