‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दिल्लीला लोटांगण घालताहेत’; आदित्य ठाकरेंची टीका

गेल्या काही वर्षांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्याचे मुख्यमंत्री केवळ दिल्लीला लोटांगण घालण्याचे काम करत आहे.

    सिन्नर : गेल्या काही वर्षांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्याचे मुख्यमंत्री केवळ दिल्लीला लोटांगण घालण्याचे काम करत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये नक्कीच परिवर्तन होऊन शेतकऱ्यांचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

    आदित्य ठाकरे यांचे बुधवारी (दि.१४) नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. इगतपुरी येथे दुपारी मेळावा घेतल्यानंतर ते सिन्नरकडे रवाना झाले. यावेळी मातोश्री नर्मदा लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला भाव नसून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. कुठल्याही शेतमालाला भाव मिळत नसून शेतकऱ्यांसमोर आत्महत्येचा पर्याय उरला आहे.

    मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री महाराष्ट्राचे प्रश्न दिल्ली समोर मांडण्यास घाबरतात. केंद्र सरकारकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असून, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकारकडून होत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून केवळ उद्योजकांचे असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले.

    महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे षडयंत्र

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्याचे काम केंद्र सरकारकडून होत असून, महाराष्ट्राचे महत्त्व करण्याचे काम या निमित्ताने सुरू आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी न करता आल्याने मुंबईचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व संपवण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमच्या हक्काचे जे आहे ते आम्हाला मिळणारच, ते आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ ठाकरे म्हणाले.