आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे घेत केला आरोप 

    मुंबई : माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांच्या विदेश दौऱ्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत. याशिवाय त्यांनी एक्स म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देखील सरकारला प्रश्न विचारले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रद्द झालेला जर्मनी लंडन दौरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा रद्द झालेला घाना दौरा यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा प्रस्तावित विदेश दौरा यावर आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आहेत.

    आदित्य ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा जर्मनी आणि लंडनला दौरा निघाला होता. जर्मनीला हायवे बघायचं कारण दिलं होतं. कुठचे हायवे बघायचे आहेत? तुमच्याकडे ७-८ वर्ष एमएसआरडीसीचं खातं आहे मग सगळे हायवे चुकीचे बनवलेले आहेत का? असा सवाल त्यांनी केला. मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. कोणत्या गुंतवणूकदारांना ते भेटणार आहेत. कोणकोणत्या ठिकाणांना भेटी देणार आहेत, असं विचारलं होतं. मात्र, पुढच्या तीस मिनिटांमध्ये दौरा रद्द झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

    या घटनाबाह्य सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत ज्यांना फॉरेन ट्रिप करायला आवडते. फॉरेन ट्रिप चुकीची नाही. पण हे जनतेच्या पैशातून फॉरेन ट्रिप करायला लागलेत. पण या दौऱ्यांतून नेमकं निघतंय काय? हा खरा प्रश्न आहे, असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा हा जपान सरकारच्या निमंत्रणावरुन होता हे शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे जपान सरकारच्या निमंत्रणावरुन तो दौरा असला तरी त्याचा खर्च एमआयडीसीकडून करण्यात आला आहे. खरंतर ज्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी हा खर्च करायला होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जीआरमध्ये एका महिन्यानंतर सविस्तर अहवाल सादर केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. आता एक महिना झालेला आहे, सविस्तर अहवाल कुठं आहे. उपमुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेटशिवाय दुसरं काही दिसत नाही. मानद डॉक्टरेटसाठीच्या ट्रीपचा खर्च एमआयडीसीनं का करावा, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

    आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, उद्योग मंत्र्यांचा यूके, स्विझरलँड आणि जर्मनीचा दौरा मंजूर झाला आहे. यूकेत ते गोलमेज परिषदेला उपस्थित राहतील. मात्र, त्याची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पुढे ते आर्टिफिशयल इंटेलिजन्ससंदर्भातील परिषदेला उपस्थित राहतील. त्यानंतर स्विझरलँडमध्ये दावोसमध्ये ते पाहणी करणार आहेत. दावोसचा पालकमंत्री देखील तिथल्या ठिकाणाची पाहणी करायला जात नाही. जागतिक आर्थिक परिषद जानेवारीत होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर ते जर्मनीत म्युनिचला गोलमेज परिषदेला जाणार आहेत. त्याची देखील माहिती समोर आलेली नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.