आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याशिवाय राहणार…., कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

किती वाड्यांना रस्ते नाहीत. पिण्याचे पाणी नाही. किती लोकांना आधार कार्ड नाही, घरकुले नाहीत....

    कल्याण : कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातील आहेत. तरीपण आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचीत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार असा इशारा श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब भोईर यांनी दिला आहे.

    कल्याण तालुक्यातील अनेक आदिवासी पाडे आहेत. ज्या ठिकाणी आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाले तरी पण मुंबई पासून हाकेच्या अंतरावर राहणारा आदिवासी बांधवाना पाणी नाही, घर नाही. सुरुवातीपासून एक प्रकारे समाज वंचित आहे. बुधवारी सकाळी कल्याणमध्ये तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी मजिवी संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढला. कल्याणच्या सुभाष चंद्र बोस चौकातून घोषणाबाजी करीत या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चा दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण तहसील कार्यालयात मोर्चेकरांनी ठिय्या मांडला. समाजाला काय त्रास सहन करावा लागतो याची व्यथा तहसीलदार जयराज देशमुख यांच्यासमाेर मांडली. अनेक आदिवासी बांधवांकडे साधे आधार कार्डही नाही.

    या प्रसंगी राजेश चन्ने, प्रदेश सचिव बाळाराम भोईर हे उपस्थित होते. यावेळी भोईर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनाही पत्र देणार आहोत. किती वाड्यांना रस्ते नाहीत. पिण्याचे पाणी नाही. किती लोकांना आधार कार्ड नाही, घरकुले नाहीत. याची गावाच्या नावासह यादी देणार अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण केल्या नाही तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याशिवाय मजीवी संघटना राहणार नाही असा इशारा दिला आहे.