अतिरिक्त शिक्षकांचे दिवाळीपूर्वी समायोजन?; शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेत (Schooling) संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे (Surplus Teacher) दिवाळीपूर्वीच समायोजन करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला असून, तसे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

    जालना : जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेत (Schooling) संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे (Surplus Teacher) दिवाळीपूर्वीच समायोजन करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला असून, तसे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

    शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांची शैक्षणिक सत्र 2022-23 ची संचमान्यता काही दिवसांपूर्वी वितरित करून अतिरिक्त व रिक्त पदांची माहिती घेतली होती. काही शाळांमध्ये बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने व शासनाकडून भरती बंदी असल्याने ही पदे शाळांना भरता आली नाही.

    परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी सातत्याने शिक्षक संघटना व संस्थाचालकांकडून केली जात होती. अखेर शिक्षण संचालनाल याच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचे वेळापत्रक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे.

    10 ऑक्टोबरपर्यंत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे संस्थाअंतर्गत समायोजन करणे, 13 ऑक्टोबरपर्यंत अतिरिक्त व रिक्तपदांची माहिती सादर करणे, 18 ऑक्टोबरपर्यंत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करणे, 20 ऑक्टोबरपर्यंत प्रकाशित यादीवर आक्षेप मागविण्यात येणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी या आक्षेपांवर सुनावणी होईल. 27 ऑक्टोबर रोजी अतिरिक्त शिक्षक अंतिम यादी व रिक्त जागा जाहीर केल्या जाणार असून, 31 ऑक्टोबर रोजी समायोजन समुपदेशन पद्धतीने होईल.