पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांचे समायोजन अटळ, शिक्षकांची विद्यार्थी शोध मोहीम सुरू

उन्हाळ्याच्या दिवसात आवश्यक तेवढ्या विद्यार्थ्यांची जुळवा जुळव करायची आणि वर्षभरासाठी तरी आपली नोकरी सुरक्षित ठेवायची, हे असे किती दिवस चालणार, हा प्रश्न आहे. कोरोनानंतर आता पुन्हा शिक्षकांच्या वाटेला तीच भटकंती आल्याने शिक्षकाही पायाला भिंगरी लावत उन्हातान्हात विद्यार्थी शोधत असल्याचे दिसून येत आहे.

    गोंदिया : पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल वाढल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या वेगाने कमी होत आहे. दरवर्षी संचमान्यतेनुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची पदे निश्चित केली जातात. पण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली होती. आता शाळा सुरू झाल्याने पुन्हा पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी शोध मोहिम आरंभली आहे. शाळेतील तुकडी टिकविण्यासाठी शिक्षक समर्थ ठरले तर, त्यांचे समायोजन अटळच आहे.

    गुरुजीं समोर हे मोठे आव्हान असल्याने शिक्षकांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा चालविला आहे. प्राथमिक शाळांचे इयत्ता चौथी, पाचवी आणि आठवीचे निकाल जवळपास जाहीर झाल्याने आता माध्यमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात भटकत आहेत. ‘विद्यार्थी असेल तर तुकडी टिकेल’ पर्यायाने नोकरी राहील, अशी अवस्था सध्या शिक्षकांची झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्याकरिता शिक्षकांकडून विविध प्रलोभने, आमिषे पालकांना दाखविली जात आहेत.

    विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याचा खर्च, गणवेश व पुस्तकांचा खर्च आदींसाठी शिक्षकांनाच पदरमोड करावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात आवश्यक तेवढ्या विद्यार्थ्यांची जुळवा जुळव करायची आणि वर्षभरासाठी तरी आपली नोकरी सुरक्षित ठेवायची, हे असे किती दिवस चालणार, हा प्रश्न आहे. कोरोनानंतर आता पुन्हा शिक्षकांच्या वाटेला तीच भटकंती आल्याने शिक्षकही पायाला भिंगरी लागल्या गत उन्हातान्हात विद्यार्थी शोधत असल्याचे दिसून येत आहे.

    शिक्षकच बनताहेत शिक्षकांचे वैरी

    विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे अन्य शाळेत समायोजन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. ही बाब शिक्षकांना माहिती असूनही ते न समजल्यागत करीत असून शाळा आणि शिक्षकांमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. आता प्रवेशाच्या रणधुमाळीत शिक्षकच एकमेकांचा वैरी बनत असल्याचे चित्र आहे.