पीएम किसान इ- केवायसीसाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; उद्या शेवटची संधी

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी इ-केवायसी केली, मात्र तरीही पुरंदर तालुक्यातून तब्बल साडेसतरा हजार शेतकऱ्यांनी इ- केवायसी केली नव्हती. शासनाच्या या उपक्रमापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी मागील आठवड्यात पुन्हा संधी दिली होती. ती उद्या (दि०७ सप्टेंबर) ला संपत आहे.

  • इ- केवायसीसाठी उद्या शेवटची संधी
  • पुरंदरच्या कृषी व महसूल प्रशासनाने कसली कंबर

पिसर्वे : केंद्र शासनाने २०१८ मध्ये देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्या मध्ये देण्यास सुरुवात केली. यामुळे गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा झाला आहे. मात्र योजना जशी लोकप्रिय झाली तशी मोठ्या शेतकऱ्यांनी, पगारदार, मृत लोकांच्या नावाने लोकांनी याचा लाभ घेतला होता. त्यांच्यावर कारवाई करत शासनाने गतवर्षी दिलेला निधी परत घेतला. त्यानंतर राहिलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांना मे २०२२ पूर्वी इ- केवायसी. करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे इ-केवायसी केली, मात्र तरीही पुरंदर तालुक्यातून तब्बल साडेसतरा हजार शेतकऱ्यांनी इ- केवायसी केली नव्हती. शासनाच्या या उपक्रमापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी मागील आठवड्यात पुन्हा संधी दिली होती. ती उद्या (दि०७ सप्टेंबर) ला संपत आहे. यातून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पुरंदर तालुक्यात कृषी व महसूल विभागाने कृषी सहाय्यक, महा इ-सेवा केंद्र, सीएससी केंद्रांच्या माध्यमातून कंबर कसली आहे. आता आज अखेर राहिलेल्या जवळपास सात ते आठ हजार शेतकऱ्यांच्या हातात उद्या शेवटची संधी राहिली असून. त्यानंतर मात्र या सर्व शेतकऱ्यांचा पीएम किसान चा लाभ संपुष्टात येणार असला तरी तसे होऊ नये, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागातील गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतातील कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केली होती. मात्र खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी शासन वरचेवर या योजनेत बदल करत असते. त्यानुसार मागील ११ व्या हप्त्यापूर्वी शासनाने मे महिन्यात शेतकऱ्यांना इ-केवायसी करून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ती करूनही घेतली. मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांनी इ-केवायसी करणे टाळले होते. त्यातून एकट्या पुरंदर तालुक्यात जवळपास १७ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी इ-केवायसी करणे टाळले होते. त्यासाठी मागील महिन्यात संधी देऊन दि.३१ ऑगस्ट पूर्वी पुन्हा एकदा केवायसी पूर्ण करण्यास सांगितले होते. ही मुदत संपल्यावर देखील शासनाने सात दिवस पुन्हा मुदत वाढवून देऊनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने, तसेच ओटीपी उशिरा मिळणे, बायोमेट्रिक न चालणे, आधार कार्डला मोबाईल लिंक नसने अशा अडचणीचा सामना आता उर्वरित शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्याने व बायोमेट्रिकही बंद असल्याने त्यांची उद्याची शेवटची संधी हुकणार असून त्या शेतकऱ्यांना या महिन्यात येणाऱ्या पीएम किसान च्या बाराव्या हप्त्याला मुकावे लागणार आहे.

पीएम किसान साठी मागील दोन दिवसांपासून सर्वाधिक वंचित लोक असलेली गावे निवडून तेथे शिबिरे आयोजित करून त्यांचे इ-केवायसी करून घेण्यात येत आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या मांडकी, परींचे, पारगाव, बेलसर अशा गावांमधून अशी शिबिरे सुरू आहेत. काल सोमवार अखेर ६७ टक्के लाभार्थ्यांचे ई केवायसी पूर्ण झाले होते. त्यामुळे काल ३५ हजारपैकी ११,८४७ लाभार्थी वंचित राहिले होते. यातूनही मृत लाभार्थी, आयकर भरणारे, स्थलांतरित, नोकरदार वर्ग यांना वगळले तर केवळ ८ हजार लोक वंचित राहणार आहेत. त्यांची इ-केवायसी. येत्या दोन दिवसांत कृषी, महसूल व सीएससी च्या माध्यमातून पूर्ण करून घेणार आहोत. मात्र त्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा सुरळीत सुरू होणे अपेक्षित आहे.

सुरज जाधव (तालुका कृषी अधिकारी पुरंदर)

पुरंदर तालुक्यामध्ये सध्या पीएम किसान चे काम दोन स्तरावर सुरू आहे. यापैकी एक म्हणजे इ- केवायसी करणे तर दुसरे म्हणजे पुरंदर तालुक्यातील ३५ हजार खातेदारांनी या योजनेसाठी भरलेली माहिती अपडेट करणे. त्यापैकी तब्बल ३० हजार लाभार्थ्यांची माहिती आत्तापर्यंत अपडेट करून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आली आहे, तर आता फक्त ५ हजार लोक राहिले असून या कामासाठी तलाठी व महसूलचे कर्मचारी गुंतलेले असल्याने इ के.वाय.सी. ची जबाबदारी ही कृषी सहाय्यकांना तसेच सी एससी केंद्र चालकांना दिलेली आहे. पीएम किसान च्या पार्श्वभूमीवर आता केवळ जमीन व इ-केवायसी. ची माहिती अपडेट होत असून लवकरच माहितीचे प्रमाणीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे त्यामधून मृत, नोकरदार, आयकर भरणारे असे अनेकजण कमी होतील.

रुपाली सरनोबत (तहसिलदार पुरंदर)

सध्या तरी पीएम किसान च्या लाभांपासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पुरंदर तालुक्यातील कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. मात्र ई केवायसी करताना बायोमेट्रिक सुरू न होणे तसेच ओटीपी वेळेत उपलब्ध न होणे या अडथळ्यांच्या शर्यती मधून उद्या शेवटच्या मुदतीपर्यंत राहिलेल्या जवळपास सात ते आठ हजार शेतकऱ्यांना पीएम किसान च्या येणाऱ्या बाराव्या हप्त्यापासून वंचित रहावे लागू शकते.