
पुणे : पुणे सिटी अॅमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन आणि रोटरी क्लब यांच्या वतीने महिला बॉक्सिंग खेळाडूंसाठी दत्तक योजना सुरू केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, आहारविषयक सल्ला आदींचा समावेश आहे.
आठ खेळाडूंची या दत्तक योजनेसाठी निवड
असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश बागवे, सरचिटणीस मदन वाणी, रोटरी क्लब आॅफ सेंट्रलचे अध्यक्ष निवृत्त कमांडर अभय चिटणीस, सचिव आणि अॉल इंडिया बॉक्सिंग फेडरेशनचे माजी सचिव निवृत्त ब्रिगेडीअर मुरलीधरन राजा यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुणे जिल्हा आणि शहरातील महिला बॉक्सिंग खेळाडूंची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्षात घेऊन आठ खेळाडूंची या दत्तक योजनेसाठी निवड केली आहे.
पुण्यातील खेळाडूंची गुणवत्ता वाढावी
योजनेत झीनत शेख, भूमिका खिलारे, हर्षदा लोहाट, रिया कुटे, सोनिया सूर्यवंशी, सृष्टी चोरगे, वैष्णवी कदम, समीक्षा सूर्यवंशी यांचा समावेश आहे. पुण्यातील खेळांडूंची गुणवत्ता वाढावी याकरीता रोटरी क्लबने यात पुढाकार घेतला आहे.
प्रशिक्षकांनाही मार्गदर्शन केले जाणार
सदर योजनेत निवड केलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणातील नवीन तंत्रज्ञान, साहित्याची उपयाेगिता, इतर देशातील खेळांडूची खेळण्याची पद्धत अशा विविध स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ खेळाडूच नाही तर पुण्यातील विविध बाॅक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे.
मार्गदर्शनाचा फायदा पुण्यातील खेळाडूंना
यामुळे अांतरराष्ट्रीय पंचाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा पुण्यातील खेळाडूंना मिळण्यास मदत हाेईल असे राजा यांनी नमूद केले. या याेजनेत खेळाडू, त्यांचे पालक यांना अाहारविषयक, व्यायाम, प्रशिक्षणादरम्यान हाेणाऱ्या शारिरीक दुखापती अादी संदर्भातही मार्गदर्शन केले जाईल असे बागवे यांनी नमूद केले.