अखेर ठरलं! उज्ज्वल निकम भाजपचे मुंबईचे उमेदवार; पूनम महाजन यांचा पत्ता कट

भाजपकडून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे.

    मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर महायुतीकडून मुंबईचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला. भाजपकडून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे.

    भाजपकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये भाजपने उत्तर मध्य मुंबईतून वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिले जात असल्याचे जाहीर केले आहे. मागील अनेक दिवसांपासून महायुती मुंबईमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. पुजा महाजन या मतदारसंघामध्ये सक्रीय झाल्या होत्या. अनेकांनी पूनम महाजन यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात होते. मात्र भाजपने पूनम महाजन यांचा पत्ता कट केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

    कोण आहेत उज्ज्वल निकम?

    भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकिल आहेत. निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. ते मूळचे जळगावचे आहेत. त्यांचे वडील देवरावजी निकम हे देखील न्यायाधीश होते तर आई गृहिणी होती. बीएससी झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनीही जळगावमधून कायद्याची पदवी घेतली. तिथल्या जिल्हा न्यायालयातून त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राज्य स्तरावरील केसेस लढण्यास सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील केसेसही हाताळण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार निकम यांनी आतापर्यंत 628 हून अधिक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचं काम केलं आहे. तर 37 आरोपींना मृत्यूची शिक्षा मिळवून दिली आहे. हायप्रोफाईल केसेस हाताळत असल्यामुळे त्यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यांनी गुलशन कुमार मर्डर केस, प्रमोद महाजन मर्डर केस, 2013 तील मुंबई गँग रेप, मुंबईवरील हल्ल्याची केस आणि मुंबई बॉम्बस्फोटाची केस आदी अंत्यत महत्त्वाच्या केसेस ते लढलेल्या आहेत.