विश्वासघात करुन स्वार्थासाठी गेलेल्यांनी लोकांना मूर्ख समजू नये : अ‍ॅड. वैभव पाटील

खानापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात करुन, स्वार्थ व सत्तेसाठी अंधारात पळून गेलेल्या प्रतिनिधींनी टेंभू  व विट्याच्या पाणीप्रश्नांचा आधार घेऊन सहानुभुती मिळविण्याचा व लोकांना मुर्ख करण्याचा प्रयत्न करु नये.

    विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात करुन, स्वार्थ व सत्तेसाठी अंधारात पळून गेलेल्या प्रतिनिधींनी टेंभू  व विट्याच्या पाणीप्रश्नांचा आधार घेऊन सहानुभूती मिळविण्याचा व लोकांना मूर्ख करण्याचा प्रयत्न करु नये, अशी टीका विट्याचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील (Adv. Vaibhav Patil) यांनी आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांचे नाव न घेता केली.
    अ‍ॅड. पाटील म्हणाले, तुमचा पूर्व इतिहास पाहिला तर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी व आत्ता शिवसेना या पक्षांचा स्वार्थासाठी पुरेपुर वापर करुन या पक्षांचा, पक्ष नेतृत्वांचा व मतदारसंघाचा विश्वासघात करुन प्रत्येकवेळी अंधारात पक्ष बदल केला आहे. गेल्या काही वर्षात शिवसेनेबरोबर सत्तेत राहून दुसऱ्याच पक्षाबरोबरचा तुमचा वावर लोकांपासून लपून राहिलेला नाही. आत्ता सुद्धा ज्या पक्ष नेतृत्वाने व कार्यकर्त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. त्यांना धोका देऊन, विश्वासघाताने गद्दारी करुन व मतदारसंघातील जनतेला अंधारात ठेऊन केवळ स्वार्थासाठी पळून गेला आहात. लोकांची सहानुभुती मिळवण्यासाठी टेंभू योजना, विट्याच्या पाण्याचे नाव देऊन नेहमीप्रमाणे लोकांना मुर्खात समजू नका, लोक आता सुज्ञ झालेत हे विसरु नका.
    ते म्हणाले, टेंभूचे आजपर्यंत झालेले काम हे गेल्या २५-३० वर्षांतील सर्वच आमदार तसेच बाजूच्या मतदारसंघातील आमदार, मंत्रिमहोदय या सर्वांच्या योगदानाने झाले आहे. विद्यमान आघाडी शासन व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मतदारसंघांतील वंचित गावांचा टेंभूमध्ये समावेश करुन मतदारसंघाला न्याय दिला आहे.