मोदींकडून शरद पवारांना ऑफर नसून सल्ला; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘ऑफर ’ दिली नाही, तर त्यांना सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच देशात परीपक्व  विरोधी पक्ष नसुन, भाजपने कधीही विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला नाही, असा दावा त्यांनी केला.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘ऑफर ’ दिली नाही, तर त्यांना सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच देशात परीपक्व  विरोधी पक्ष नसुन, भाजपने कधीही विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला नाही, असा दावा त्यांनी केला. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ फडणवीस हे पुण्यात आले होते. यानिमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी फडणवीस यांनी शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली.
    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील असे विधान पवार यांनी केले होते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी पवार यांनी अजित पवार यांच्या आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे अशी प्रतिक्रीया व्यक्त केली होती. यासंदर्भात पत्रकारांनी मोदी यांनी पवार यांना ‘ऑफर’ दिली हेती, असे विचारले असता, फडणवीस म्हणाले, ‘‘ निवडणुकीत पराभव होणार असल्याची कल्पना आल्यानेच पवार यांनी तसे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना ‘ऑफर’ दिली नाही. त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना ‘सल्ला’ दिला आहे. ’’
    भाजपकडून संविधान बदलले जाणार आहे, पक्ष फोडाफाेडीचे राजकारण, चौकश्या मागे लावून विराेधी पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप केला जात आहे. त्यापद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रचारात दिसुन येत आहे, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘‘विराेधक हे विकासाच्या मुद्दयावर बाेलू शकत नाही. यामुळे संविधान बदलण्यासारखा विषय पुढे केला जात आहे. वास्तविक काॅंग्रेसने घटनेत ८० वेळा बदल केले आहेत. इंदीरा गांधी यांनी तर माेठे बदल केले हाेते. त्यामुळे विराेधकांचा आराेप चुकीचा आहे. राजकारणात काेणीही  विराेधी पक्ष हा काेणीच संपवू शकत नाही. काॅंग्रेसची आजची अवस्था ही त्यांच्या कर्माची फळ आहे. त्यांच्याकडे अपरीपक्व नेतृत्व आहे. त्यावरच ते सातत्याने विश्वास दाखवित आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हे पक्ष ‘फॅमिली फर्स्ट’ या भुमिकेमुळेच फुटले आहेत. आम्ही पक्ष किंवा घरे फाेडत नाही.’’ असं फडणवीस म्हणाले.
    फडणवीस म्हणाले ‘‘पुण्यात मला एका गुन्ह्यात अडकविण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली हाेती. त्यासाठी एका पाेलीस आयुक्ताला सुपारी दिली हाेती. याचे सगळे पुरावे माझ्याकडे असुन, ते वेळ आली की मी बाहेर काढेन’’ शरद पवार यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना फडणवीस यांनी  शरद पवार यांचा गांधी विचाराशी काही संबंध नाही अशी उपराेधिक टीका केली. तसेच काॅंग्रेसने गेल्या साठ वर्षांत गांधींजीच्या सेवाग्रामसाठी जेवढे काही केले नाही. तेवढा विकास भाजपने गेल्या दहा वर्षात या सेवाग्रामचा केला आहे. असंही ते म्हणाले.
    केंद्र सरकार आणि  राज्य सरकारच्या सहकार्यातून पुणे शहराला जाेडणाऱ्या महामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभे केले जाणार आहे. रिंगराेड बांधला जाणार आहे, मेट्राे, ई बसेस आदीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट केली जाणार आहे. स्मार्ट सिटी याेजनेतील अनेक कामे सुरु आहे, समान पाणी पुरवठा याेजना, नदीकाठ सुधार याेजना आदी मुळे पुढील काळात पुणे शहर शाश्वत शहर म्हणून पुढे येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.